नागपूर जिल्ह्यात वीज कोसळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 11:31 PM2018-07-06T23:31:42+5:302018-07-06T23:33:56+5:30
शेतात चारायला नेलेल्या गाई घराकडे परत घेऊन येत असताना जोरात कडाडलेली वीज कोसळून होरपळलेल्या दोन विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रामटेक तालुक्यातील खिंडसी डागबेल परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५.४५ ते ६ वाजताच्या दरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतात चारायला नेलेल्या गाई घराकडे परत घेऊन येत असताना जोरात कडाडलेली वीज कोसळून होरपळलेल्या दोन विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रामटेक तालुक्यातील खिंडसी डागबेल परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५.४५ ते ६ वाजताच्या दरम्यान घडली.
हर्षल काशिनाथ चनेकर (१७) व नागेश्वर हंसराज मोहुर्ले (१८) दोघेही रा. सोनपूर (पिंडकापार) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघांची शेती जवळजवळ आहे. ते दोघेही शेतात गाई चारण्यासाठी घेऊन गेले होते. दरम्यान सायंकाळच्या सुमारास ते दोघेही गाई घराकडे परत घेऊन येत होते. तेवढ्यात जोरात कडाडलेली त्यांच्याजवळ कोसळली. त्यात दोघेही होरपळल्याने गंभीररीत्या जखमी झाले. काही वेळातच हर्षल व नागेश्वरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
विजेच्या आवाजामुळे गार्इंनी घराच्या दिशेने पळ काढला. दरम्यान, दोघेही परत न असल्याने कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. तेव्हा दोघेही पडून दिसले. त्यांना लगेच रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.
दोघेही एकुलते एक
विशेष म्हणजे, हर्षल व नागेश्वर त्यांच्या आईवडिलांना एकुलते एक होते. दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तसेच नागेश्वरच्या वडिलांचे आधीच निधन झाल्याने ते कुटुंबीयांना हातभार लावून शिक्षण घ्यायचे. हर्षल हा मुसेवाडी (ता. रामटेक) येथील मातोश्री काशिदेवी कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता तर नागेश्वरने यावर्षी रामटेक येथील नरेंद्र तिडके कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.