‘आऊटिंग’साठी निघाले अन् परतलेच नाही; अंबाझरी तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 01:19 PM2022-07-04T13:19:50+5:302022-07-04T13:30:16+5:30
तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या. त्या धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता पाय घसरून ते पाण्यात पडले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही.
नागपूर : सकाळपासून पाऊस असल्याने ‘आऊटिंग’ करण्यासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाला. चप्पल धुवायला दोघे तलावात उतरले असताना त्यांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे अंबाझरी तलावाजवळ खळबळ उडाली होती. मिहीर शरद उके (२०, इंदोरा) व चंद्रशेखर किशोर वाघमारे (२०, लष्करीबाग) ही मृत विद्यार्थ्यांची नावे असून या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
रविवारी दुपारी मिहीर उके व चंद्रशेखर वाघमारे हे अंबाझरी तलावाजवळ फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत अक्षय मेश्राम व प्रशिक भिडे हे त्यांचे मित्रदेखील होते. अंबाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या. त्या धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही. त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शिवाय परिसरातील इतर नागरिकांनादेखील आरडाओरड करत मदतीसाठी बोलविले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांच्याही नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अक्षय व प्रशिकने तातडीने पोलिसांना माहिती दिली. अंबाझरी पोलीस ठाण्यातील चमू घटनास्थळी पोहोचली. दोघांच्याही कुटुंबीयांना माहिती देण्यात आली व पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले.
फिरण्यासाठी निघाले अन्..
मिहीर, चंद्रशेखर, अक्षय व प्रशिक हे चौघेही अनेक दिवसांपासूनचे मित्र होते व ‘सोशल मीडिया’वरदेखील सक्रिय होते. रविवारी वातावरण आल्हाददायक असल्याने चौघेही फिरण्यासाठी अंबाझरी तलावाजवळ गेले होते. मात्र घरून निघालेले दोघे परत आलेच नाहीत. या घटनेची माहिती कळताच दोघांच्याही नातेवाइकांना प्रचंड धक्का बसला. याशिवाय डोळ्यासमोर मित्र गमावल्याने अक्षय व प्रशिकला मोठा धक्का बसला आहे.
विद्यार्थ्यांचे ‘आऊटिंग’ ठरतेय धोकादायक
ग्रुपमध्ये अंबाझरी तलावाजवळ फिरायला आलेल्या मित्रांमधील काही जणांचा अतिउत्साह धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. १६ एप्रिल रोजी काही विद्यार्थी अंबाझरी तलावात फिरायला गेले होते. तेव्हा यश रेड्डी या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. तर ५ जून रोजीदेखील विद्यार्थ्यांचा ग्रुप फिरायला गेला असताना त्यांना पोहायचा मोह आवरला नाही व बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.