नागपूर जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:14 PM2018-02-19T23:14:55+5:302018-02-19T23:18:41+5:30
तलावात पोहायला उतरलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रामटेक तालुक्यातील डोंगरी शिवारातील तलावात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तलावात पोहायला उतरलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रामटेक तालुक्यातील डोंगरी शिवारातील तलावात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
राजिक अहमद शेख (१४) व सोहेल इस्माईल शेख (१५) दोघेही रा. आझाद वॉर्ड, रामटेक, अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघेही महादुला येथील संत ज्ञानेश्वर विद्यामंदिरमध्ये इयत्ता दहावीत शिकायचे. सोमवारी सुटी असल्याने ते त्यांच्या मित्रांसोबत डोंगरी शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दोघांनाही व्यवस्थित पोहता येत नव्हते. सर्व जण पोहत असताना दोघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाले. ते बुडत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी रामटेक गाठून कुटुंबीयांना माहिती दिली. त्यामुळे नातेवाईकांसह पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास पाण्याबाहेर काढले. सोहेल हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे आझाद वॉर्डात शोककळा पसरली. या प्रकरणाची रामटेक पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.