नागपूर नजीक अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:39 PM2018-03-01T22:39:34+5:302018-03-01T22:39:53+5:30
अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) शिवारातील तलावाजवळ पिकनिकसाठी गेले होते. त्यातील दोघे पोहण्यासाठी तलावात उतरले; मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना होळीच्या दिवशी अर्थात गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) शिवारातील तलावाजवळ पिकनिकसाठी गेले होते. त्यातील दोघे पोहण्यासाठी तलावात उतरले; मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना होळीच्या दिवशी अर्थात गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
सिद्धेश लक्ष्मीनारायण माळोदे (२०, रा. श्रीहरीनगर, मानेवाडा रोड, नागपूर) व मंथन मधुकर मंदारधरे (२०, रा. ऊर्जानगर, चंद्रपूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. सिद्धेश व मंथन वानाडोंगरी येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीईच्या प्रथम वर्षाला होते. मंथन हा वानाडोंगरी येथे राहायचा. ते त्यांच्या अन्य तीन मित्रांसोबत दुपारी १२ वाजताच्या सुमारास हिंगणा तालुक्यातील मोहगाव (झिल्पी) शिवारातील तलावाजवळ पिकनिकसाठी गेले होते.
सर्वांनी मौजमस्ती केल्यानंतर सिद्धेश व मंथन तलावात पोहण्यासाठी उतरले. वास्तवात, दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यांनी इतर तिघांनाही पोहण्याचा आग्रह केला; मात्र तिघांनी त्यांना नकार देत काठावर बसणे पसंत केले. दरम्यान, दोघेही खोल पाण्यात गेले आणि गटांगळ्या खाऊ लागले. ही बाब लक्षात येताच काठावरील तिघांनी त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. परिणामी, तिघांनी आरडाओरड केल्याने शिवारातील नागरिक गोळा झाले.
काहींनी या घटनेची माहिती लगेच हिंगणा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचाही पाण्यात शोध घेतला. दुपारी २ वाजताच्या सुमारास दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.
---
कुप्रसिद्ध तलाव
मोहगाव (झिल्पी) शिवारातील हा तलाव मृत्यूसाठी कुप्रसिद्ध मानला जातो. या तलावात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला असून, मृतांमध्ये नागपूर येथील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. बुडून मृत्यूमुखी पडण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता पाटबंधारे विभागाने या तलावाच्या काठावर मोठा सूचना फलक लावला आहे. या तलावात आंघोळ करण्यासाठी किंवा पोहण्यासाठी कुणीही उतरू नये, असे आवाहन या सूचना फलकाद्वारे पाटबंधारे विभागाने केले आहे. मात्र, हौशी मंडळी या सूचनेकडे सपशेल डोळेझाक करतात आणि तलावात पोहण्यासाठी उतरतात. त्यातूनच दुर्दैवी घटना घडतात.
***