भरधाव जेसीबीच्या धडकेत दोन विद्यार्थी ठार : नागपुरातील कळमन्यात भीषण अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:18 AM2019-06-04T00:18:22+5:302019-06-04T00:19:22+5:30
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री भरधाव जेसीबीने विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री भरधाव जेसीबीने विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. पृथ्वीराज मनोहर जाधव (वय २१, रा. हाऊसिंग बोर्ड कॉलनी, रघुजीनगर) आणि सुशांत सुभाष नागदेवते (वय २५, रा. आदिवासी कॉलनी), अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर, गंभीर जखमी झालेल्याचे नाव शुभम गुणवंतराव वाघ (वय २०, रा. आदिवासी कॉलनी) असे आहे.
पृथ्वीराज हा पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षाचा, सुशांत बारावीचा विद्यार्थी होता. शुभमही महाविद्यालयीन विद्यार्थी असून, हे तिघे घनिष्ट मित्र होते. सुशांतकडे हॉरनेट ही स्पोर्ट बाईक (एमएच ४९/एएक्स ३२९५) होती. तिने पृथ्वीराज, सुशांत आणि शुभम रविवारी रामटेकला गेले होते. तेथील मित्रांसोबत गडमंदिर दर्शन आणि दिवसभर गंमतजंमत केल्यानंतर रात्री त्यांनी जेवण घेतले. त्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने रामटेकवरून नागपुरात परत येत होते. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर मार्गावरील शेंद्रे ढाब्यासमोर चुकीच्या दिशेने वेगात जेसीबी (एमएच ३४/ एल ६६७९) चालविणाऱ्याने दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे स्पोर्ट बाईक चक्काचूर झाली आणि पृथ्वीराज तसेच सुशांतचा करुण अंत झाला तर शुभम गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती कळताच कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. तोवर बघ्यांची मोठी गर्दी अपघातस्थळी जमली होती. शुभम तसेच पृथ्वीराज आणि सुशांतच्या मोबाईलवरून पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि शेजारची मंडळी रुग्णालयात पोहचली. पृथ्वीराज आणि सुशांतचा मृत्यू झाल्याचे कळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. शिवराज रणजित जाधव (वय २४, रा. वकीलपेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
त्याच्या हलगर्जीपणामुळे दोन कुटुंबीयांच्या काळजात जखम
मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराजचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला रामटेकला बोलवून घेतले होते. रविवारी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे त्याच्या मित्रांनी प्लॅनिंग केले. मात्र वाढदिवसाच्या एक दिवसापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली.
पृथ्वीराजचे वडील बसचालक असून, त्याला दोन बहिणी आहेत. मोठी बहीण हैदराबादला अभियंता म्हणून कार्यरत आहे तर, छोटी बहीण शिकत आहे. सुशांतला वडील नाही. त्याची आई उषा नागदेवते निवृत्त पारिचारिका आहेत. आईच्या पेन्शनवर भागत नसल्याने सुशांत स्वत: कॅटरिंगचे काम करायचा. तो त्याच्या वृद्ध आईचा एकमात्र आधार होता. तोच हरविल्याने उषा नागदेवते यांच्यावर जबर मानसिक आघात झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जेसीबी चालक राँग साईड असूनही भरधाव वेगाने अवजड वाहन दामटत होता. त्याच्या हलगर्जीपणामुळे दोन युवकांचे बळी गेले, तर त्यांच्या कुटुंबीयांच्या काळजात कायमची जखम झाली आहे.
नंदनवनमध्येही वृद्धाला चिरडले
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतही सोमवारी सकाळी एका भरधाव वाहनाने गुलाबराव चौधरी (वय ७८) नामक वृद्धाला धडक देऊन त्यांचा बळी घेतला. नेहमीप्रमाणे ते उमरेड मार्गावर सकाळी ६ च्या सुमारास फिरत होते. विशेष म्हणजे, भीषण अपघातात चौधरी गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या बाजूला विव्हळत असताना अनेकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात पोहचविण्याऐवजी त्यांचे जखमी अवस्थेतील फोटो मोबाईलमध्ये काढण्यात वेळ घालविला. बराच वेळाने एका सामाजिक कार्यकर्त्याने चौधरी यांना रुग्णालयात पोहचविले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी दोषी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.