नागपूरहून मुंबईसाठी दोन सुपरफास्ट वन-वे ट्रेन; शनिवारी धावणार पहिली गाडी
By नरेश डोंगरे | Published: October 14, 2022 06:18 PM2022-10-14T18:18:13+5:302022-10-14T18:19:39+5:30
प्रवाशांची गर्दी वाढली
नागपूर : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनेनागपूरहून मुंबईसाठी दोन सुपरफास्ट वन-वे ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील एक ट्रेन शनिवारी १५ तर, दुसरी १८ ऑक्टोबरला सुरू होणार आहे.
दिवाळी तोंडावर असल्याने प्रवाशांची रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. ती लक्षात घेता मध्य रेल्वेने नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वन-वे स्पेशल (ट्रेन नंबर ०१०७६) विशेष शुल्कावर सुरू केली आहे. ती नागपूर स्थानकावरून १५ ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजता सुटेल आणि १६ ऑक्टोबरच्या पहाटे ४ वाजता मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
त्याचप्रमाणे ट्रेन नंबर ०१०७८ ही नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई वन-वे स्पेशल रेल्वेगाडी १८ ऑक्टोबरला दुपारी १.३० नागपूर स्थानकावरून निघेल आणि १९ ऑक्टोबरला पहाटे ३.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या दोन्ही गाड्या प्रवासादरम्यान वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर या स्थानकावर थांबून प्रवाशांची ने-आण करेल.
अशी राहील सुविधा
या दोन्ही स्पेशल रेल्वे गाड्यांमध्ये दोन एसी २ टियर, ८ एसी ३ टियर, ४ शयनयान श्रेणी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी कोच असतील. यात एका गार्ड व्हॅन आणि जनरेटर व्हॅनचाही समावेश आहे.ो