दोन वर्षात दोन हजार ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:25 AM2017-10-03T00:25:39+5:302017-10-03T00:26:36+5:30
देशात २२ लाख ड्रायव्हरची कमतरता आहे. येत्या दोन वर्षात देशात दोन हजार ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात येणार आहेत,.....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात २२ लाख ड्रायव्हरची कमतरता आहे. येत्या दोन वर्षात देशात दोन हजार ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात येणार आहेत, यातून देशाला प्रशिक्षित ड्रायव्हर उपलब्ध होतील, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे ट्रक ड्रायव्हर, क्लीनर व हेल्परसाठी ‘नि:शुल्क नेत्र तपासणी मोहीम’ राबविण्यात येत आहे. ६ आॅक्टोबरपर्यंत चालणाºया या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी राष्ट्रीय महामार्ग-७ च्या नागपूर बायपास पांजरी टोल प्लाझा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. समीर मेघे आणि एनएचएआयचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, दरवर्षी पाच लाख अपघात होतात. त्यात दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. यावर आम्ही लहानलहान उपाययोजना शोधल्या. परिणामी तीन वर्षात यंदा पहिल्यांदाच अपघातामध्ये पाच टक्के कमतरता आली आहे. पुढील दोन वर्षात आणखी कमी येईल, किमान ५० हजार लोकांचे जीव आम्ही वाचवू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गडकरी म्हणाले, माझ्याही गाडीचा अपघात झाला होता. त्याचे कारण म्हणजे माझ्या कारच्या ड्रायव्हरच्या डोळ्याला ‘कॅट्रॅक’ (मोतियाबिंदू) होता. रस्त्यावर धावणारे ट्रक ड्रायव्हर यांच्याही डोळ्याचे विविध दोष असतात. त्यामुळेही अपघात होतात. या पार्श्वभूमीवर ड्रायव्हरच्या डोळ्यांची तपासणी झाली तर त्यांचाही जीव वाचेल आणि इतरांचेही जीव वाचेल, असा विश्वास व्यक्त करीत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि दारू पिऊन ट्रक चालवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
देशात ७०० ‘ड्रायव्हर क्लब’
ट्रक ड्रायव्हर हे देशात सातत्याने फिरत असतात. त्यांच्यासाठी महामार्गावर ७०० ड्रायव्हर क्लब निर्माण करण्याची योजना आहे. यात ड्रायव्हरसाठी गार्डन, मॉल, दुकाने, विश्रामगृह आदी सुविधा असतील. सध्या ७० क्लबचे टेंडर निघाले आहेत. तसेच ट्रक ड्रायव्हर हे १२ ते १८ तास गाडी चालवतात. त्यांना सुविधा व्हावी, यासाठी त्यांचे केबीन हे वातानुकूलित करता येईल का याबाबत आपण ट्रक निर्मात्या कंपनीशी चर्चा केली होती. त्यांनी आपला अहवाल दिला आहे. एअर कूलरद्वारे कॅबीनचे तापमान कमी ठेवता येणे शक्य होईल, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
देशात ५० ठिकाणी एकाचवेळी नेत्र तपासणी शिबिर
सामाजिक जाणिवेतून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे देशातील २१ राज्यात ५० ठिकाणी एकाचवेळी ट्रक चालक, मदतनीस आणि क्लिनरसाठी नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी गडकरी यांच्या हस्ते ट्रक चालकांना चष्मे वितरित करण्यात आले. ६ आॅक्टोबरपर्यंत हे शिबिर चालेल. पांजरी टोल नाक्यावर मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर माथनी टोल प्लाजा येथे ४ व ५ आॅक्टोबरला शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी जवळपास ३०० ट्रक चालकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
असे शिबिर नियमित व्हावे
सर्वाधिक अपघात हे महामार्गावर होतात. ट्रक चालकांना डोळ्याचे विविध आजार असतात. परंतु जनजागृतीचा अभाव आणि सातत्याने ते फिरत असल्याने तपासणी करू शकत नाही, ते दवाखान्यापर्यंत येत नाहीत. अशावेळी त्यांच्यासाठी टोल नाक्यावरच तपासणीची व्यवस्था ही अतिशय चांगली सुरुवात आहे.
-डॉ. अंकिता काबरा
अतिशय चांगला उपक्रम
मी अनेक दिवसांपासून ट्रक चालवतो. गेल्या काही वर्षांपासून माझ्या डोळ्यातून पाणी येते. अंधुक दिसत होते. अपघताची भीती वाटायची. डोळ्याची तपासणी करण्याची इच्छा होती. पण, वेळच मिळत नव्हता. आज डोळे तपासले तेव्हा मला चष्मा लागल्याचे समजले. चष्माही मिळाला. आता चांगले दिसत आहे. आता चांगल्याने गाडी चालवू शकेल.
-रामनरेश यादव
ट्रक ड्रायव्हर बिहार, औरंगाबाद