नागपूरहून आखातात दोन हजार शेळ्या जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:59 AM2018-06-27T10:59:04+5:302018-06-27T11:03:06+5:30

नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३० जूनला पहिल्यांदाच दोन हजार शेळ्या-मेंढ्या आखाती देशांमध्ये निर्यात केल्या जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिली.

Two thousand goats Transport from Nagpur to the Gulf | नागपूरहून आखातात दोन हजार शेळ्या जाणार

नागपूरहून आखातात दोन हजार शेळ्या जाणार

Next
ठळक मुद्दे३० जून रोजी पहिला टप्पाफडणवीस यांच्या उपस्थितीत योजनेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३० जूनला पहिल्यांदाच दोन हजार शेळ्या-मेंढ्या आखाती देशांमध्ये निर्यात केल्या जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिली.
सोमवारी उद्योग भवनामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कृषी व प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाचे (अपेडा) महाव्यवस्थापक उपेन्द्र वत्स हेदेखील यावेळी उपस्थित होते.
विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेळ्या-मेंढ्या निर्यात करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून पहिल्या टप्प्यात ३० जूनला दोन हजार शेळ्या आखाती देशात निर्यात केल्या जातील. निर्यात होणाऱ्या शेळ्या-मेंढ्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या टप्प्यातील शेळ्या-मेंढ्या निर्यात केल्या जातील, असे डॉ. महात्मे यांनी सांगितले.

चार महिन्यात जाणार ५० फ्लाईट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३० जूनला पहिल्यांदाच शेळ्या-मेंढ्या दुबईत निर्यात केल्या जाणार आहे. याचे संचालन दुबईतील पोल स्टार कंपनी करणार आहे. एअर बस-३०० या कार्गो विमानात एकाच वेळी १० केज (एका केजमध्ये ५० शेळ्या-मेंढ्या) अर्थात ६०० शेळ्या-मेंढ्या जातील. विमान आठवड्यात तीन दिवस उड्डाण भरेल. येत्या चार महिन्यात जवळपास ५० फ्लाईट दुबईला जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक फ्लाईटमागे मिहान इंडिया लिमिटेडला ७ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. विमानात नेण्यापूर्वी शेळ्या-मेंढ्या तपासणी पोल स्टार कंपनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे करणार आहे. कस्टम विभागाकडून क्लिअरन्स मिळाल्यानंतर विमानाला हिरवी झेंडी मिळेल. विमानाचे उड्डाण दुपारी १ ते ४ यादरम्यान होईल.
- विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक़

शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाच्या नवीन संधी
केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय कृषी मंत्रालय, मिहान, एअर इंडिया यांच्या संयुक्त सहभागातून ही योजना आखली गेल्याचे महात्मे यांनी सांगितले. या नवीन उपक्रमाद्वारे मेंढपाळ तसेच शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोजगाराच्या तसेच आर्थिक उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. भविष्यात शेळ्या-मेंढ्या निर्यातीसाठी सहकारी संस्था निर्माण करण्याची योजना असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.

Web Title: Two thousand goats Transport from Nagpur to the Gulf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Transferबदली