कारागृहातील बंदीवान रोज फस्त करतात दोन हजार किलोंचा 'भत्ता'
By नरेश डोंगरे | Published: November 24, 2023 06:16 PM2023-11-24T18:16:50+5:302023-11-24T18:19:07+5:30
सकाळी ६ पासून सुरिवात : ६ तासांची भट्टी, रोजच्या रोज होतो जेवणात बदल
नरेश डोंगरे
नागपूर : शहर असो अथवा गावातील रहिवासी. अपवाद वगळता बहुतांश जणांकडे सकाळचा चहाही तयार व्हायचा असतो. ‘त्या’ वसाहतीत मात्र भल्या सकाळीच किचन सुरू होते. सुमारे अडीच हजार जणांना सकाळी १० ते ११ या वेळेत जेवण द्यायचे असल्यामुळे भल्या सकाळपासूनच भात, पोळ्या, वरण-भाजीच्या तयारीची लगबग सुरू होते. सकाळीच भट्टी लावली जाते अन् सुमारे ५० जणांच्या परिश्रमातून ‘त्या’ सर्वांच्या ‘क्षुधा तृप्ती’ची सुविधा तयार केली जाते. हिवाळा असो, पावसाळा असो की उन्हाळा. वर्षातील १२ महिने आणि ३६५ दिवस हा नित्यक्रम अखंडितपणे सुरू असते. सण-वार असो की आणखी कोणताही दिवस त्या वसाहतीतील अर्थात कारागृहातील किचन आणि भत्त्याला सुटी नसतेच.
ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी १८६४ साली नागपूरला मध्यवर्ती कारागृह तयार केले. या कारागृहाची सध्याची बंदीवानांची क्षमता १९०० कैद्यांची असली तरी येथे रोज सुमारे अडीच हजार कैदी बंदिस्त असतात. कधी कधी ही संख्या २७०० ते २८०० पर्यंत जाते. नव्या गुन्ह्यातील कैद्यांना आतमध्ये डांबणे आणि जामीन झालेल्यांना येथून मुक्त करणे, ही रोजचीच प्रक्रिया. तरीसुद्धा सुमारे २५०० कैदी येथे मुक्कामी असतातच. त्यांना सकाळी ७ वाजता चहा नाश्ता दिला जातो. त्यानंतर सकाळी १० ते ११.३० पर्यंत सर्वांना जेवण दिले जाते. परत रात्रीचे जेवण त्यांना ७ च्या आतमध्येच देण्याचे प्रयोजन आहे. कारण रात्री ७ नंतर सर्व कैद्यांना बराकीत बंद करायचे असते. त्यामुळे सकाळचे जेवण आटोपताच तास-दोन तासांनंतर सायंकाळच्या जेवणाचीही भट्टी येथे सुरू केली जाते.
सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळेच्या जेवणाऱ्यांची संख्या रोज किमान पाच हजार जणांची असते. त्यांच्यासाठी दोन्ही वेळेला भातपोळ्या तर असतातच वरण किंवा भाजी वेगवेगळी तयार केली जाते. कधी डाळभाजी, कधी आलूवांगे, कधी काही तर कधी काही, असा हा रोजचा मेणू असतो. त्याला ‘भत्ता’ म्हटले जाते.
असा तयार होतो दोन वेळेचा भत्ता
गहू (पीठ) - १००० किलो
तांदूळ (भात) - २५० ते ३०० किलो
डाळ - १०० किलो
तेल, मसाल्याची लिस्ट वेगळी
पोळी, भात आणि डाळीचे ठिक आहे. डाळ आणि भाज्या बनविण्यासाठी लागणारे टोमॅटो, मिरची सांबार (सर्व एकत्र) पालेभाज्या भाज्या सुमारे २०० किलो लागतात. मात्र, तेल, मीठ, मिरची, मसाले आणि ईतर पदार्थ नेमके किती लागतात, ते संबंधितांकडून स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरे म्हणजे, उपरोक्त आकडेवारी जवळपास ५ हजार कैद्यांच्या जेवणाची आहे. त्यात रोज कैद्यांच्या संख्येनुसार बदल होतो.