व्यवहारातून दोन हजाराच्या नोटा गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:37 PM2018-06-26T23:37:24+5:302018-06-26T23:39:43+5:30
दैनिक व्यवहारातून दोन हजारांच्या नोटा गायब होत असल्याची तक्रार अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दैनिक व्यवहारातून दोन हजारांच्या नोटा गायब होत असल्याची तक्रार अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
भारत सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी एक हजाराची नोट बंद करून दोन हजाराची नोट चलनात आणली. त्यामुळे काळा पैसा बाहेर आला. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत झाली. पूर्वी दोन हजारांच्या, नंतर पाचशेच्या नोटा चलनात आणल्या. या नोटांनी व्यवहार होऊ लागले. पण आता दोन हजारांच्या नोटा चलनात फारच कमी दिसत आहेत. कुणी व्यक्ती वा समुदाय दोन हजारांच्या नोटांचा स्टॉक करीत आहेत वा रिझर्व्ह बँक दोन हजारांच्या नोटा चलनात कमी आणत आहेत, याची दोन कारणे असू शकतात. पुढील वर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे. निवडणुकीसाठी दोन हजारांच्या नोटांचा थोडा थोडा स्टॉक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शंका अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने व्यक्त केली आहे.
सरकारने काळ्या पैशांवर नियंत्रण आणण्यासाठी दोन हजारांच्या नोटांचा साठा करण्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी संस्थेचे राष्ट्रीय चेअरमन प्रकाश मेहाडिया, अध्यक्ष बी.जी. कुळकर्णी, राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी, उपाध्यक्ष सुभाष अग्रवाल, नागपूर जिल्हा अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सचिव प्रताप मोटवानी, महिला सचिव रंजिता नवघरे यांनी पत्रद्वारे केली आहे.