रामनवमी बंदोबस्तसाठी दोन हजार पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:45 PM2019-04-12T23:45:26+5:302019-04-12T23:46:22+5:30
उपराजधानीचे वैभव समजली जाणारी पोद्दारेश्वर राममंदिरातील शोभायात्रा शनिवारी शहरातून निघणार आहे. यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची जोरदार तयारी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीचे वैभव समजली जाणारी पोद्दारेश्वर राममंदिरातील शोभायात्रा शनिवारी शहरातून निघणार आहे. यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची जोरदार तयारी केली आहे.
रामनवमी निमित्त ऐतिहासिक पोद्दारेश्वर राममंदिरातून भव्य शोभायात्रा काढली जाते. या शोभायात्रेत १०० वर सजीव दृष्ये (झांकी) असतात. ही शोभायात्रा बघण्यासाठी नागपूर शहरच नव्हे तर आजूबाजूच्या गावातूनही हजारो नागरिक येतात. शहरातील विविध भागातून ही शोभायात्रा निघते. त्यात हजारो भाविकांचा सहभाग असतो. ते लक्षात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शोभायात्रेची सुरक्षा व्यवस्था कशी असेल, त्याची आधीच तयारी करून ठेवली. त्यामुळे शनिवारच्या शोभायात्रा बंदोबस्तात ५ पोलीस उपायुक्त, १० सहायक आयुक्त २०० अधिकारी आणि १८०० पोलीस तसेच होमगार्डस् बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहे.
नागपुर. शोभायात्रेचा मार्ग विविध विभागात (सेक्टर) विभाजित करण्यात आला असून, प्रत्येक सेक्टरसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय पोद्दारेश्वर राममंदिर समितीचे विश्वस्त देखील शोभायात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलिसांना स्वयंसेवक पुरविणार आहेत.