भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर दोन हजार पोलिसांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2023 10:49 PM2023-02-08T22:49:45+5:302023-02-08T22:51:34+5:30
Nagpur News भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात जामठा येथील व्हीसीए मैदानावर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.
नागपूर : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात जामठा येथील व्हीसीए मैदानावर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी जवळपास दोन हजार पोलिस तैनात राहणार असून मैदान परिसरात सर्वेलन्स व्हॅन व ‘क्यूआरटी’ची तुकडीदेखील राहणार आहे. विशेष म्हणजे सामना संपल्यावर वर्धा मार्गावर वाहतूककोंडी होऊ नये यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
पाच दिवस सामना सुरू होण्याची वेळ व सायंकाळी संपण्याच्या वेळेत वाहतुकीची कोंडी लक्षात घेता ४०० हून अधिक वाहतूक पोलिस तैनात करण्यात येतील. सामना संपल्यावर हजारो क्रिकेटप्रेमी एकाच वेळी बाहेर पडल्याने वर्धा रोडवर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत.
दोन्ही संघांसाठी हॉटेल आणि जामठा क्रिकेट मैदानापर्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषत: सामन्याच्या दिवशी वर्धा मार्गावर मैदानाच्या आत व बाहेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली २ हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी व अधिकारी तैनात राहणार आहेत.
१३ प्रवेशद्वारांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था
मैदानाच्या आत व परिसरात तसेच प्रवेशद्वारांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असेल. व्हीसीएचे कॅमेरे तसेच पोलिसांच्या मोबाईल सर्वेलन्स व्हॅनचे कॅमेरे प्रत्येक ठिकाणी नजर ठेवतील. सोबतच कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीमही तैनात करण्यात येणार आहे. स्टेडियमच्या १३ प्रवेशद्वारांवर पोलिसांसह व्हीसीएचे खासगी सुरक्षारक्षकही तैनात असतील. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ४० हून अधिक मेटल डिटेक्टर्स आणि डोअर फ्रेम मॉनिटर्सचा उपयोग करण्यात येणार आहे.
अशी राहणार सुरक्षा व्यवस्था
तैनात अधिकारी - संख्या
पोलिस उपायुक्त - ८
सहायक आयुक्त - १०
पोलिस निरीक्षक - ३५
एपीआय-पीएसआय - १३८
पोलिस कर्मचारी (पुरुष) – १६००
महिला पोलिस कर्मचारी- ४००