दोन व्यापाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या; पेट्रोलने मृतदेह जाळून फेकले नदीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 09:09 AM2023-07-28T09:09:24+5:302023-07-28T09:09:37+5:30
पाच आरोपींना अटक : पैशांच्या व्यवहारातून केले क्राैर्य
नागपूर : नागपुरातील दोन व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपींनी दोन्ही व्यापाऱ्यांच्या
अंगावर पेट्रोल टाकून त्यांचे अर्धवट जळालेले मृतदेह वर्धा नदीच्या पात्रात फेकले. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पैशांच्या व्यवहारातून या हत्या करण्यात आल्याची बाब तपासात पुढे आली आहे.
निरालाकुमार सिंह (वय ४३, रा. एचबी टाऊन) आणि अंबरीश देवदत्त गोळे (वय ४१, जयप्रकाशनगर) असे मृत व्यापाऱ्यांची नावे आहेत. तर आरोपीत ओंकार महेंद्र तलमले (वय २५, रा. स्मृती ले आऊट), हर्ष आनंदीलाल वर्मा (वय २२, रा. वाडी), दानेश दुर्गाप्रसाद शिवपेठ (वय २१, रा. गोधनी), लकी संजय तुर्केल (वय २२, रा. मरियमनगर सिताबर्डी), हर्ष सौदागर बागडे (वय १९, रा. दत्तवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
निरालाकुमार व अंबरीश हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. दोघांचेही हिस्लॉप महाविद्यालयाजवळील चिटणवीस सेंटरजवळून आरोपींनी अपहरण केले. तेथून ते कोंढाळी येथील रिंगणाबोडी शिवारातील संजय तुर्केल याच्या फार्म हाऊसवर गेले. तेथे पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. आरोपींनी दोन्ही व्यापाऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून अर्धवट जळालेले मृतदेह वर्धा नदीच्या पात्रात फेकून दिले.
कुजलेल्या स्थितीत आढळले मृतदेह
मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तिवसा पोलिसांच्या मदतीने शोध मोहिम राबविली असता भारवाडीनजीक वर्धा नदीच्या दुसऱ्या टोकाला परतोडा (जि. वर्धा) हद्दीत एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तर दुसरा मृतदेह खडगा गावाजवळ आढळला. पेट्रोल टाकून मृतदेह पाण्यात फेकल्यामुळे दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले आहेत. तपास पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी बापु रोहोम, कोंढाळीचे ठाणेदार पंकज वाघोडे करीत आहेत.