एकाच क्रमांकाची दोन वाहने; दोन्ही मालकांच्या नावाने फाडले चालान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 10:24 PM2022-04-12T22:24:06+5:302022-04-12T22:26:06+5:30
Nagpur News दोन भिन्न वाहनांवर एकच क्रमांक आढळून आल्याने येथील आरटीओ अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे.
नागपूर : वाहनांची खरेदी केल्यानंतर आरटीओकडून प्रत्येक वाहनाला स्वतंत्र क्रमांक दिला जाताे. मात्र, एकच क्रमांक दाेन वेगवेगळ्या दुचाकी वाहनांना तसेच एका वाहनाची चालान दाेन वाहनांच्या मालकांना देण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. या प्रकारामुळे आरटीओ अधिकाऱ्यांचा अनागाेंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
धर्मेंद्र पाणतावने, रा. चिचाली-खापरखेडा, ता. सावनेर यांच्याकडे एमएच-४०/बीए-९९४० क्रमांकाची माेटारसायकल आहे. त्यांना ३१ मार्च राेजी आरटीओकडून चालान प्राप्त झाली. ही चालान पाेस्टाने त्यांच्या घरी पाठविण्यात आली हाेती. त्याचा संदेशही त्यांच्या माेबाईल फाेनवर आला हाेता. चालानमधील वाहनाचा फाेटाे टीव्हीएस ज्युपिटर तसेच क्रमांक सारखा असल्याने त्यांनी पाेलिसांत धाव घेतली.
यासंदर्भात खापरखेडा पाेलिसांच्या सूचनेवरून धर्मेंद्र यांनी नागपूर शहरातील आरटीओ कार्यालयात चाैकशी केली. तेव्हा ती चालान त्यांना चुकीने पाठविण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. शिवाय, एकाच क्रमांकाची दाेन दुचाकी वाहने असल्याचेही स्पष्ट झाले. एकाच क्रमांकाची दाेन वाहने असल्याने तसेच ती ज्युपिटर चाेरीची असल्याचा संशय आल्याने आपल्यावर कारवाई हाेऊ नये म्हणून आपण आरटीओला पत्र दिल्याचेही धर्मेंद्र पाणतावने यांनी सांंगितले.