भरधाव कारचालकांनी घेतले दोन बळी
By Admin | Published: April 20, 2015 02:13 AM2015-04-20T02:13:51+5:302015-04-20T02:13:51+5:30
भरधाव कारचालकांनी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन मुलांचे बळी घेतले. वाडी आणि नंदनवनमध्ये हे अपघात घडले.
नागपूर : भरधाव कारचालकांनी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन मुलांचे बळी घेतले. वाडी आणि नंदनवनमध्ये हे अपघात घडले.
अन्मय ज्योतिसिंग रवींद्रसिंग काला (वय ११, रा. वडधामना, सुराबर्डी) हा बालक रविवारी दुपारी १.३० वाजता वाडी गुरुद्वाराजवळ रस्ता ओलांडत होता. तेवढ्यात त्याला एमएच ३४/एएम ४५७८ क्रमांकाच्या कारचालकाने जोरदार धडक मारली. अन्मय गंभीर जखमी झाला. त्याला डॉक्टरकडे नेले असता मृत घोषित केले. या अपघातामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. अपघातानंतर दोषी कारचालक पळून गेला. गुरुमितसिंग अविनाशसिंग काला (वय ४५) यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी दोषी कारचालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केलेली नव्हती.
नंदनवनमधील अपघात १४ एप्रिलच्या सायंकाळी ६ च्या सुमारास झाला होता. हरीश शैलेंद्र शाहू (वय १५) सायकलने जात होता. कोहिनूर लॉनजवळ त्याला भरधाव कारचालकाने (एमएच १२/जेयू ०१९६) जोरदार धडक मारली. त्यामुळे हरीश गंभीर जखमी झाला. त्याला न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना हरीशचा मृत्यू झाला. हे प्रकरण दडपण्यासाठी आरोपीकडून काही जणांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे काही वेळ रुग्णालयातही वातावरण संतप्त झाले होते. दरम्यान, नंदनवन पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)