नागपूरच्या मेडिकलमध्ये स्क्रब टायफसचे पुन्हा दोन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 08:38 PM2018-08-31T20:38:52+5:302018-08-31T20:42:23+5:30
‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णाचा मृत्यू शुक्रवारी झाला. यातील एक मध्य प्रदेशातील आहे तर दुसरा रुग्ण भंडाऱ्यातील होता. धक्कादायक म्हणजे, आज ११ नव्या रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. यातील २५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मेडिकलच्या अतिदक्षता विभागात सध्या पाच रुग्ण असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णाचा मृत्यू शुक्रवारी झाला. यातील एक मध्य प्रदेशातील आहे तर दुसरा रुग्ण भंडाऱ्यातील होता. धक्कादायक म्हणजे, आज ११ नव्या रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. यातील २५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मेडिकलच्या अतिदक्षता विभागात सध्या पाच रुग्ण असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
शंकर पराते (५५) रा. छिंदवाडा व सुगंधा नन्ने (५०) असे मृताचे नाव आहे.
विदर्भासह बाजूच्या मध्य प्रदेशात स्क्रब टायफसचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. रोज नवे रुग्ण दिसून येत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘स्क्रब टायफस’वरील उपाययोजनांना घेऊन दिल्ली येथील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राची (एनआयसीडी) चमू गुरुवारपासून नागपुरात तळ ठोकून आहे. प्रत्येक बाबी तपासून घेत आहे. परंतु हा रोग सर्वच भागात दिसून येत असल्याने तो कुठून व कसा पसरत आहे, याचा शोध घेण्यात त्यांना अडचण जात आहे. यामुळे ही चमू कीटकतज्ज्ञाची मदत घेणार असल्याची माहिती आहे.
उपचार सुरू होत नाही तोच मृत्यू
भंडारा येथील पवनी खैरी गावातील सुगंधा नन्ने यांना शुक्रवारी मेडिकलच्या अतिदक्षता विभागात भरती केले, परंतु उपचार सुरू होत नाही तोच मृत्यू झाला. छिंदवाडा येथील शंकर पराते हा रुग्ण मेडिकलमध्ये बुधवारी भरती झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, हे दोन्ही रुग्ण मेडिकलमध्ये दाखल झाले तेव्हा रोगाची गुंतागुंत वाढली होती.
मेडिकलमध्ये स्क्रब टायफसची चाचणी होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच मेडिकलने रुग्णाची जलद गतीने चाचणी करण्यासाठी ‘रॅपिड टेस्ट’ सुरू केली. मात्र आरोग्य विभागाच्या निकषानुसार अचूक चाचणी करण्यासाठी मेडिकलमध्ये शुक्रवारपासून ‘एलायझा’ चाचणीला सुरुवात झाली.
मेडिकलमध्ये ‘एलायझा’चाचणी
‘रॅपिड टेस्ट’मधून स्क्रब टायफसचे निदान योग्य होईलच याची शाश्वती नाही. त्यामुळे, आरोग्य विभागाने मेडिकलला ‘एलायझा’ चाचणी उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी यावर ४५ रुग्णांच्या रक्ताचे नमुने लावले असून शनिवारी त्याचा अहवाल येईल. या चाचणीतून योग्य निदान होऊन नेमके किती रुग्ण आहेत, ते स्पष्ट होईल.
डॉ. मिलिंद गणवीर
सहायक संचालक, (हिवताप) आरोग्य विभाग नागपूर.
/>
मृत्यूची आकडेवारी
ठिकाण मृत्यू संख्या
खैरी, भंडारा १
छिंदवाडा १
मोवाड नरखेड १
नरखेड १
अकोला १
बालाघाट १
काटोल १
जरीपटका नागपूर १