स्वाईन फ्लूचे दोन बळी : नागपूरच्या गोरेवाडा परिसरात २५ वर रुग्णांची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 10:43 PM2019-01-11T22:43:42+5:302019-01-11T22:45:07+5:30
नववर्षात स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. गोरेवाडा परिसरात या आजाराचे चार रुग्ण पॉझिटिव्ह आले असून २५वर संशयित रुग्ण असण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लूबाबत वाढत्या भीतीच्या वातावरणाला घेऊन शुक्रवारी असंघटित कामगार काँग्रेसच्यावतीने परिसरातील संतप्त नागरिकांनी महापौर नंदा जिचकार यांना घेराव घालून उपाययोजना करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नववर्षात स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. गोरेवाडा परिसरात या आजाराचे चार रुग्ण पॉझिटिव्ह आले असून २५वर संशयित रुग्ण असण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लूबाबत वाढत्या भीतीच्या वातावरणाला घेऊन शुक्रवारी असंघटित कामगार काँग्रेसच्यावतीने परिसरातील संतप्त नागरिकांनी महापौर नंदा जिचकार यांना घेराव घालून उपाययोजना करण्याची मागणी केली.
प्रफुल्ल मेंढे (३०) रा. गोरेवाडा व श्रीमती रामटेके (४५) रा. बोरगाव असे मृताचे नाव असल्याचे या आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून या नावाची अद्यापही नोंद झालेली नाही.
असंघटित कामगार काँग्रेसचे नागपूर उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद लाहोरी यांनी सांगितले, गोरेवाडा परिसरात सध्याच्या स्थितीत २५वर रुग्ण स्वाईन फ्लू संशयित आहेत. यातील चार रुग्ण पॉझिटिव्ह आले असून मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या विषयाला घेऊन महापौर जिचकार यांना घेराव घालून उपाययोजना करण्याची मागणी केली. परंतु त्यांना विषयाचे गांभीर्य नसल्याने वेळ मारून नेली. बुधवारपर्यंत मनपाकडून विशेष सोयी उपलब्ध न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशाराही लाहोरी यांनी दिला. आंदोलनात दुर्गाप्रसाद लाहोरी यांच्यासह मोनु मेंढे, युगल विधावत, गुड्डू नेताम, नीलिमा दुपारे यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.
मनपा दवाखान्यात औषधे नाहीत
मृत प्रफुल्ल मेंढे यांचे भाऊ मोनु मेंढे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ७ जानेवारी रोजी प्रफुल्लचा रामदासपेठ येथील एका खासगी इस्पितळात मृत्यू झाला. त्याच दिवशी मानकापूर येथील एका खासगी इस्पितळात श्रीमती रामटेके यांचा मृत्यू झाला. या शिवाय गोरेवाडा परिसरात अनेक स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आहेत. या आजाराचे रुग्ण वाढत असताना मनपाचे आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. गोरेवाडातील महापालिकेच्या दवाखान्यामध्ये स्वाईन फ्लूची औषधे नाहीत. रुग्णांना बाहेरून विकत घेण्यास सांगितले जाते. आजाराबाबत डॉक्टर मार्गदर्शन करीत नाही. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही मेंढे म्हणाले.
गेल्या वर्षात ११ मृत्यू
शहरात २०१८ या वर्षात स्वाईन फ्लूचे ६३ रुग्ण व ११ मृत्यूची नोंद आहे. तर २०१७ मध्ये ऐन उन्हाळ्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. नागपूर विभागात या वर्षांत ६३४ रुग्ण तर ११९ रुग्ण बळी पडले. २०१८ मध्ये विभागात ११० रुग्ण १८ मृत्यूची नोंद झाली आहे.