विदर्भातील दोन साहित्यिकांची उमेदवारीत आघाडी
By admin | Published: September 2, 2015 04:25 AM2015-09-02T04:25:37+5:302015-09-02T04:25:37+5:30
ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातून ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज
नागपूर : ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातून ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. त्यानंतर मंगळवारी विदर्भ साहित्य संघात त्यांनी दुसरा अर्ज भरला. विदर्भातीलच ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवीन्द्र शोभणे यांनी विदर्भ साहित्य संघातून अर्ज भरल्यानंतर मंगळवारी मुंबई मराठी साहित्य संघातून दुसरा अर्ज भरला आहे. यामुळे सध्यातरी विदर्भातले दोन साहित्यिक संमेलनाध्यक्ष पदाच्या शर्यतीत कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.
ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी आता होऊन जाऊ द्या, असा नारा दिला आहे. गेली ४० वर्षे घरादाराकडे लक्ष न देता खेड्यापाड्यात कविता वाचनाचे कार्यक्रम केले. कविता घराघरात पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले. शेतकरी आणि शेतमजूर यांचे दु:ख सातत्याने कवितेतून मांडले. प्रामुख्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. केवळ पॅकेजने प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांची समस्या सुटली नाही आणि त्यामुळेच संमेलनाध्यक्ष होऊन शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण या शर्यतीत उतरल्याचे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला पाठिंबा मिळत असून संमेलनाध्यक्ष होण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. विठ्ठल वाघ यांनी आज विदर्भ साहित्य संघात दोन अर्ज भरले. काही कारणाने वा अनावधानाने एखादा अर्ज चुकला तरी उमेदवारी रद्द होऊ नये म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली आहे. त्यांचे सूचक डॉ. मनोज तायडे असून अनुमोदक डॉ. बबन तायवाडे, बबन नाखले, अतुल लोंढे, कुमार बोबडे आहेत. तर दुसऱ्या अर्जात सूचक डॉ. मनोज तायडे असून अनुमोदक डॉ. बबन तायवाडे, बबन नाखले, अतुल लोंढे, कुमार बोबडे आणि डॉ. शरयु तायवाडे आहेत. मुंबईतून डॉ. रवींद्र शोभणे यांनी भरलेल्या अर्जात सूचक अशोक कठाळे तर अनुमोदक डॉ. उषा देशमुख, नीलिमा भावे, दीपक घारे, शुभांगी पांगे, डॉ. पुष्पलता शेट्ये आहेत. मुंबईतून रवींद्र शोभणे यांचा एकमेव अर्ज या शर्यतीत आहे.
३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करण्याची वेळ असून सायंकाळी ७ वाजता या शर्यतीत कोण उमेदवार आहे, ते स्पष्ट होणार आहे. ३ सप्टेंबरपर्यंत अधिक उमेदवारांचे अर्ज येण्याची शक्यता असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र कसे असेल ते कळेल. (प्रतिनिधी)