कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी दोन वॉर्ड तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:24 PM2020-03-09T23:24:10+5:302020-03-09T23:25:23+5:30
कोरोना व्हायरसमुळे खळबळ उडाली असताना रेल्वे रुग्णालयाने कोरोनाच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी दोन वॉर्ड तयार केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसमुळे खळबळ उडाली असताना रेल्वे रुग्णालयाने कोरोनाच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी दोन वॉर्ड तयार केले आहेत. महिला आणि पुरुष रुग्णांसाठी प्रत्येकी २० या प्रमाणे ४० जणांना ठेवण्याची सुविधा या वॉर्डमध्ये रेल्वे रुग्णालयाने केली आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकूण १७ हजार रेल्वे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. तर नागपूर रेल्वेस्थानकावरून दिवसाकाठी १५० प्रवासी रेल्वेगाड्या ये-जा करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांना कोरोना व्हायरसबद्दल माहिती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पाच दिवसांपासून ध्वनिक्षेपकाहून सूचना देणे सुरू केले आहे. याशिवाय रेल्वेस्थानकावर स्टिकर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. परंतु केवळ जनजागृती करून चालणार नसून एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्याला ठेवण्यासाठी विशेष वॉर्ड असणे गरजेचे असल्याची बाब रेल्वे प्रशासनाच्या ध्यानात आली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुग्णालयात संशयित कोरोनाच्या रुग्णांसाठी दोन वॉर्ड तयार केले आहेत. यात एक वॉर्ड महिलांसाठी तर दुसरा पुरुषांसाठी तयार करण्यात आला आहे. या वॉर्डमध्ये प्रत्येकी २० खाटा राहणार आहेत. कोरोनाचा संशयित रुग्ण अथवा प्रवासी आढळल्यास त्यास या वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याचे नमुने घेऊन ते खासगी रुग्णालयात पाठविण्यात येतील. त्याचा अहवाल येईपर्यंत संबंधित रुग्ण या वॉर्डमध्ये भरती ठेवण्याची सुविधा करण्यात आली आहे.
संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी रेल्वे रुग्णालय सज्ज
‘कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जनजागृती सुरू केली आहे. परंतु एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्याला ठेवण्याची व्यवस्था रेल्वे रुग्णालयात नव्हती. त्यामुळे संशयित रुग्णांसाठी दोन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.’
एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग