नागपूरच्या जयस्तंभ चौकात बनणार ‘टू-वे’ उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:43 AM2018-12-13T00:43:30+5:302018-12-13T00:44:52+5:30
नागपूर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला अर्थात जयस्तंभ चौक ते लोखंडी पुलापर्यंतच्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोकडे सोपविली आहे. सेंट्रल रोड फंडाकडून प्राप्त २३२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत जयस्तंभ चौक आणि लोखंडी पुलाच्या परिसरात जंक्शन विकासाचे काम होणार आहे. या कार्यासाठी बांधकाम विभागाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. पण प्रकल्पाला मूर्तरूप महामेट्रो देणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला अर्थात जयस्तंभ चौक ते लोखंडी पुलापर्यंतच्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोकडे सोपविली आहे. सेंट्रल रोड फंडाकडून प्राप्त २३२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत जयस्तंभ चौक आणि लोखंडी पुलाच्या परिसरात जंक्शन विकासाचे काम होणार आहे. या कार्यासाठी बांधकाम विभागाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. पण प्रकल्पाला मूर्तरूप महामेट्रो देणार आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित पत्रपरिषदेत म्हणाले, या प्रकल्पांतर्गत मानस चौक आणि लोखंडी पूल परिसरात सर्वप्रथम जंक्शन आणि रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पात रेल्वे स्थानकाच्या पश्चिम आणि पूर्व परिसरात तीन-तीन लेन राहणार आहेत. जयस्तंभ चौकात रामझुल्यापासून किंग्जवे हॉस्पिटलपर्यंत ‘टू-वे’ उड्डाणपूल बनविण्यात येणार आहे. कस्तूरचंद पार्ककडून स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांकरिता रामझुल्यापासून ‘यू-टर्न’ तयार करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाकडून निघून रामझुला ते पूूर्व नागपुरात जाणाऱ्यांना गणेश टेकडीजवळ ‘यू-टर्न’ घेऊन जयस्तंभ चौकातील प्रस्तावित उड्डाण पुलावरून अथवा पुन्हा लोखंडी पुलाकडून जावे लागेल. दक्षिण नागपुरातून स्थानकावर येण्यासाठी जयस्तंभ चौकातून ‘यू-टर्न’ घ्यावा लागेल. मानस चौकात एक रोटरी बनविण्यात येईल. येथे मंदिर आणि तुलसीदास यांची प्रतिमा राहील.
याच प्रकारे लोखंडी पुलाच्या (सध्याचा आरयूबी) एका बाजूला आरयूबी बनविण्यात येणार आहे. या आरयूबीचे बांधकाम रेल्वे वाहतुकीला अडथळा न आणता पूश बॉक्स तंत्रज्ञानाने होणार आहे. कॉटन मार्केट चौकात एक गोलाकार मार्ग बनविण्यात येणार असून, त्यामुळे जंक्शन सिग्नल फ्री होऊन वाहतूक सुरळीत सुरू राहील. या प्रकल्पात आधुनिक सायनेज, स्ट्रीट फर्निचर, स्ट्रीट लाईट आणि पादचाऱ्यांसाठी सुविधा राहील. या प्रकल्पात महामेट्रो, मनपा, रेल्वे, महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
टेकडी पुलाखालील दुकानदारांना मिळणार नवीन दुकाने
प्रकल्पांतर्गत गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल तोडण्यात येणार आहे. यापूर्वी उड्डाण पुलाखालील १७२ दुकानदारांचे पुनर्वसन एसटी महामंडळ, एमपीएसआरटीसी आणि मॉडेल हायस्कूलच्या जमिनीवर करण्यात येणार आहे. येथे आधुनिक स्वरूपाचा मॉल तयार करण्यात येईल. दुकाने खालच्या माळ्यावर राहतील तर दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावर पार्किंग राहील. लोकांना या ठिकाणावरून थेट एफओबीवरून रेल्वे स्थानकावर जाता येईल. या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविली जाईल. त्यानंतर या ठिकाणी महामेट्रो मॉल उभारण्यात येणार आहे.