नागपूरच्या ग्रामीण भागात दारुड्या पोलिसाने दोघींना चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 07:26 PM2020-11-18T19:26:49+5:302020-11-18T19:28:44+5:30
Accident Nagpur News धानकापणी करून घरी परतणाऱ्या शेतमजूर महिलांना वेलतूरवरून पचखेडीच्या दिशेने येणाऱ्या दारुड्या पोलिसाने दुचाकीने चिरडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: धानकापणी करून घरी परतणाऱ्या शेतमजूर महिलांना वेलतूरवरून पचखेडीच्या दिशेने येणाऱ्या दारुड्या पोलिसाने दुचाकीने चिरडले. यात दोन महिला ठार तर एक गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रिया ढाब्याजवळ मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. रविता वासुदेव राऊत (१८) रा.पचखेडी तर सोनू गुलाब चांदेकर (३४) अशी मृत महिलांची नावे आहे. यात लक्ष्मी श्रीकृष्ण राऊत (३४) ही जखमी झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार वेलतूरवरून सुसाट वेगात दुचाकी क्रमांक एम.एच. ४ ९ / व्ही ४७८१ पचखेडीच्या दिशेने येत होती. त्याचवेळी धानकापणीचे काम आटोपून महिला मजूर येत होत्या. दारुच्या नशेत असलेल्या दुचाकीचालकाचे लक्ष न राहिल्याने व वेगावरून नियंत्रण सुटल्याने वाहन महिलांना चिरडत रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. ही दुचाकी गोवर्धन वातूजी भोयर, रा.ब्राह्मणी चालवित होते. गोवर्धन हा लोहमार्ग पोलिसांच्या नागपूर मुख्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहे. तो मूळचा ब्राह्मणी येथील राहणार आहे.
या अपघातात रविता व सोनू, लक्ष्मी या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर काही वेळपर्यंत त्या जागीच पडून होत्या. एका स्थानिकाने याबाबत ठाणेदार किशोर वैरागडे यांना उपरोक्त अपघाताची माहिती दिली. यानंतर जखमींना खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे हलविण्यात आले. त्यापैकी रविताचा मृत्यू झाला. तर सोनू हिला नागपूरला उपचारासाठी आणत असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालावली. जखमी लक्ष्मी हिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी भोयर याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९,३३७,३०४ सहकलम मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भोयर यांच्यासोबत दुचाकीवर आणखी एक जण स्वार असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा तपास वेलतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर वैरागडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे .
मदतीअभावी गेला रविताचा व सोनूचा जीव
अपघातानंतर शेतमजूर महिला जखमी अवस्थेत पडून होत्या. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. यावेळी महिला वेदनेने विव्हळत होत्या. मदतीची याचना करीत होत्या. मात्र काहीजण केवळ मोबाईलवर फोटो काढत राहीले. कुणीही खासगी वाहनाने किंवा रस्त्यावरील वाहन थांबवून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले नाही. सोबतच्या महिला जखमींना धीर देत असल्याचे पहायला मिळाले. वेळेवर उपचार मिळाले असते तर रविताचा व सोनूचा जीव वाचला असता. बघ्यांच्या अशा संवेदनहीनतेमुळे रविता व सोनूचा मृत्यू झाल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहे .