मेळघाटच्या दुर्गम भागात धावणार दुचाकी रुग्णवाहिका
By admin | Published: June 28, 2017 02:49 AM2017-06-28T02:49:23+5:302017-06-28T02:49:23+5:30
राज्यातील बऱ्याचशा दुर्गम भागात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका पोहचू शकत नाही. विशेषत: मेळघाटातील अनेक गावे या वैद्यकीय सेवेपासून दूर आहेत.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील बऱ्याचशा दुर्गम भागात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका पोहचू शकत नाही. विशेषत: मेळघाटातील अनेक गावे या वैद्यकीय सेवेपासून दूर आहेत. अशा रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णवाहिकेपर्यंत मदत देण्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका सेवेत आणण्याचा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. आॅगस्ट २०१७ पासून प्रायोगिक स्तरावर मेळाघाटात चार दुचाकी रुग्णवाहिकांची मदत घेतली जाणार आहे. विदर्भातील मेळघाट कुपोषणासाठी प्रसिद्ध आहे.
या दुर्गम डोंगरी भागात ९० टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. रस्ते, वाहतूक व दळणवळणाच्या साधनांचा अभाव आहे. उत्पन्नाची साधने कमी असल्याने गरिबीचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सकस अन्न मिळू शकत नाही. यातूनच माता आणि बालकांचे कुपोषण होते.
अस्वच्छता, अशुद्ध पाण्याची समस्या येथे कायम जाणवते. व्यसनाचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी, आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यातच दुर्गम भाग असल्याने वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध होत नाही. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रस्ता सोडून आत येत नाही. या पार्श्वभूमीवर मेळघाटाच्या दुर्गम भागात दुचाकी रुग्णवाहिकेची सेवा घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे, याची सुरुवात मुंबईच्या झोपडपट्टीतील गल्लीबोळात सुरू करण्याचा २०१५ रोजी निर्णय घेतला होता.
परंतु निधीला घेऊन अनेक अडचणी निर्माण झाल्याने ही योजना रखडत गेली. अखेर आॅगस्ट २०१७ पासून या दुचाकी रुग्णवाहिकेला मुंबईत आणि त्याच्या पाठोपाठ मेळघाटात सुरुवात होत आहे.