नागपुरात नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वाराचा गळा कापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:20 AM2019-01-07T10:20:06+5:302019-01-07T10:21:52+5:30
नायलॉनचा मांजा सर्वसामान्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. या मांजाला कुठे तरी आवर घातला जावा अशी भावना जनसामान्यात व्यक्त होत असताना, आणखी एक इसम जखमी झाला. गळा कापल्याने तब्बल २२ टाके लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नायलॉनचा मांजा सर्वसामान्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. या मांजाला कुठे तरी आवर घातला जावा अशी भावना जनसामान्यात व्यक्त होत असताना, आणखी एक इसम जखमी झाला. गळा कापल्याने तब्बल २२ टाके लागले. इसमाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने घरीच उपचार सुरू आहेत.
विनोद बोंधाडे (४४) रा. गजानन, ओंकारनगर असे त्या जखमी इसमाचे नाव. प्राप्त माहितीनुसार, १ जानेवारी रोजी विनोद आपल्या स्टेशनरी दुकानात दुचाकीवरून जात होते. सकाळी १०.१५ वाजता ओंकारनगर शताब्दी चौक मार्गावर अचानक नायलॉनचा मांजा आडवा आला. काही कळण्याच्या आत गळा कापला गेला. हाताने मांजा दूर करीत असताना हाताची बोटे कापल्या गेली. गळ्याला रक्ताची धार लागली. एका हाताने गळ्यावर रुमाल धरून दुसऱ्या हाताने त्यांनी दुचाकी घराकडे वळविली. परंतु काही दूर अंतरावर गेले असता तोल जाऊन खाली पडले. त्याच वेळी एका तरुणाने त्यांना आपल्या दुचाकीवर बसवून जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासणी करून तातडीने २२ टाके लावले. अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु एक दिवसाचा खर्च २५ हजार रुपये असल्याने आणि विनोद यांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशी सुटी घेतली. सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे. जीव धोक्यात आल्याने व आर्थिक फटका बसल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
कधी होणार कारवाई?
मनुष्याच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या नायलॉन मांजावर केवळ मकरसंक्रांतीच्या काळात बंदी न लादता सरसकट वर्षभर बंदी लादण्यात आली आहे. याअंतर्गत नायलॉन मांजाचे उत्पादन, साठा, विक्री करणाऱ्यासह वापरणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. मात्र, त्यानंतरही लपून विक्री होत असल्याने पतंगबाजांच्या हातात नायलॉन मांजा दिसून येत आहे. या मांजामुळे रस्त्यावरून रहदारी करणारे दुचाकीस्वार जखमी होत असल्याने कधी होणार कारवाई, असा प्रश्न विचारला जात आहे.