अट्टल दुचाकीचोराला अटक, १.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By दयानंद पाईकराव | Published: November 15, 2023 07:39 PM2023-11-15T19:39:33+5:302023-11-15T19:40:00+5:30
सार्वजनिक ठिकाणी उभ्या केलेल्या दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल दुचाकीचोराला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने गजाआड करून त्याच्या ताब्यातू १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूर :
सार्वजनिक ठिकाणी उभ्या केलेल्या दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल दुचाकीचोराला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने गजाआड करून त्याच्या ताब्यातू १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सैय्यद नौशाद अली सैय्यद मुनावर अली (वय ४२, रा. यादवनगर, राणी दुर्गावती चौक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ४ नोव्हेंबरला रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान उत्कर्ष प्रेमानंदन भैसारे (वय ३३, रा. भानखेडा) यांच्या दुकानात काम करणआरा शिवम सुरेश टेंभुर्णे (वय २३) याने भैसारे यांची दुचाकी मेयो हॉस्पीटलच्या अपघात विभागाच्या बाजुला पार्किंगमध्ये उभी केली. तो मुलाला घेऊन रुग्णालयात गेला. तेवढ्यात त्याची दुचाकी अज्ञात आरोपीने चोरून नेली. या प्रकरणी तहसिल पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सैय्यद नौशाद अलीला सापळा रचुन ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यासोबत तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३० हजाराची दुचाकी, पाचपावली हद्दीतून ३० हजार रुपये किमतीची दुचाकी, मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अशा चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करून त्याला तहसिल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.