छत्तीसगडमधून दुचाकीची चोरी, नागपुरात केली अटक; गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी
By दयानंद पाईकराव | Published: May 11, 2024 09:53 PM2024-05-11T21:53:56+5:302024-05-11T21:54:17+5:30
आरोपीला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीस अटक करून बेमेतरा, छत्तीसगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
नागपूर : छत्तीसगडमधील सिंघोरी बेमेतरा येथून दुचाकी चोरी करून नागपुरात फिरणाºया आरोपीला गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने अटक करून छत्तीसगड पोलिसांकडे सोपविले आहे.
गणेश महेश धनकर (२४, रा. शिवनगर पारडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोकुलप्रसाद सुखीराम ध्रुव (५०, रा. बेमेतरा, छत्तीसगड) यांनी आपली दुचाकी क्रमांक सी. जी-२५, डी-११७२ किंमत ३० हजार रुपये लॉक करून उभी केली होती. अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी चोरी केली. या प्रकरणी बेमेतरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचून आरोपी गणेशला ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीच्या इंजीन नंबर व चेचीस नंबरची तपासणई केली असता ही दुचाकी चोरी केलेली असल्याचे दिसून आले. आरोपीला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीस अटक करून बेमेतरा, छत्तीसगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.