नागपुरात दोन अपघातात दोघींचा मृत्यू : अभियंता व प्राध्यापिकेचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 08:24 PM2019-10-23T20:24:15+5:302019-10-23T23:09:13+5:30
दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात दोघींचा मृत्यू झाला. यामध्ये युवा प्राध्यापिका व अभियंता यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात दोघींचा मृत्यू झाला. यामध्ये युवा प्राध्यापिका व अभियंता यांचा समावेश आहे. जरीपटका येथे झालेल्या अपघातातमृत्यू झालेल्या प्राध्यापिकेचे नाव मंजू नंदलाल परयानी आहे. तर गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव दिव्या गुलाबराव सोनटक्के आहे. या अपघातात दिव्याचे वडील सुद्धा जखमी झाले आहे.
जरीपटका येथील रहिवासी मंजूर नंदलाल परयानी (२७) या कामठीच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये प्राध्यापिका होत्या. त्या शाळेत जाताना घरून दुचाकी घेऊन निघायच्या. दुचाकी इंदोरा येथील त्यांच्या मैत्रिणीकडे पार्क करून आर्मी पब्लिक स्कूलच्या बसने शाळेत जायच्या. सोमवारी सकाळी ७ वाजता त्या दुचाकी घेऊन निघाल्या, बाराखोली वस्तीतून जात असताना, रस्त्यावर पडलेल्या शेणावरून त्यांची दुचाकी गेल्यामुळे दुचाकी स्लीप झाली. त्या जोरदार रस्त्यावर पडल्या. दरम्यान त्यांच्या डोक्याला जखम झाली. परिसरातील लोकांनी त्यांना जनता रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मेयो रुग्णालयात पाठविले. मेयोच्या डॉक्टरांनी सीटी स्कॅन मशीन बंद असल्याचे सांगत खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे मंजू यांना सिम्स हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दुसरी घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोक्षधाम चौकात घडली. पुणे येथे स्वॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या दिव्या सोनटक्के (२९) ह्या लाडीकर लेआऊट येथे राहतात. दिव्या या वडील गुलाबराव यांना मॉरिस कॉलेजजवळील सीजीएचएस रुग्णालयातून घरी घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. वडील दुचाकी चालवित होते, तर दिव्या त्यांच्या मागे बसली होती. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मोक्षधाम चौकाजवळ असताना मागून येणाऱ्या शिवशाही बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दिव्या मागे बसल्या असल्याने थेट बसच्या चाकात आल्या. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील गुलाबराव गंभीर जखमी झाले. गुलाबराव यांना मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
विद्यार्थिनीलाही चिरडले
बुधवारी सायंकाळी यादवनगर चौकात एका अनियंत्रित ट्रकने दुचाकी चालक अल्पवयीन विद्यार्थिनीला चिरडले. मृत विद्यार्थिनी यादवनगर येथील रहिवासी ताजीम फातिमा मो. हुसैन (१६) आहे. ती सायंकाळी ६.४५ वाजता दुचाकीवर आपल्या घरी जात होती. यादवनगर चौकाजवळ मागून आलेल्या ट्रकने फातिमाला जोरदार धडक दिली. फातिमा ही अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. आईला न सांगता ती दुचाकी घेऊन बाहेर पडली होती. तिचे वडील सीबीआयमध्ये कार्यरत असून, ते जम्मू-काश्मीर येथे नियुक्त आहे.