फायरिंग रेंजमध्ये गोळीने दोन महिला जखमी

By admin | Published: April 14, 2016 03:09 AM2016-04-14T03:09:41+5:302016-04-14T03:09:41+5:30

कालीफलटण उंटखाना परिसरातील मिलिटरी फायरिंग रेंजमध्ये सैनिक प्रशिक्षण केंद्रातील बंदुकीच्या गोळ्या लागल्याने ....

Two women were injured in the firing range | फायरिंग रेंजमध्ये गोळीने दोन महिला जखमी

फायरिंग रेंजमध्ये गोळीने दोन महिला जखमी

Next

गादा गावात भीतीचे वातावरण : सैनिक प्रशिक्षणादरम्यानची घटना
कामठी : कालीफलटण उंटखाना परिसरातील मिलिटरी फायरिंग रेंजमध्ये सैनिक प्रशिक्षण केंद्रातील बंदुकीच्या गोळ्या लागल्याने गादा गावातील दोन शेतमजूर महिला जखमी झाल्या. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गादा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कचराबाई सदाशिव मेश्राम (५०) व शीला अनिल घरडे (४०), अशी जखमी महिलांची नावे आहेत. दोन्ही जखमी महिलांना मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. दुर्गा संतोष गोरले (४०) ही गोळीबाराच्या आवाजाने बेशुद्ध पडली होती. सविस्तर असे की, कामठी- गुमथळा मार्गावरील गादा शिवारात राजेश यादव यांच्या शेतात २२ महिला मजूर गव्हाची कापणी करीत होत्या. गादा गावालगत दोन कि.मी. अंतरावर कामठी मिलिटरी सैनिक प्रशिक्षण केंद्राच्या कालीफलटण उंटखाना परिसरात फायरिंग रेंज आहे. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास फायरिंग रेंजमध्ये सैनिक प्रशिक्षणादरम्यान बंदुकीच्या गोळी गहू कापणी करीत असलेल्या कचराबाई मेश्राम व शीला घरडे यांना लागल्या. यात दोन्ही महिलांना गंभीर दुखापत झाली तर दुर्गा गोरले ही गोळीबाराच्या आवाजाने बेशुद्ध पडली.

अन् महिला घरात लपल्या
नागपूर : गोळीबाराचा आवाज होताच इतर मजूर महिला शेतालगतच्या घरात लपल्याने त्या बचावल्या. लागलीच शेतमालक राजेश यादव यांनी जखमी महिलांना शेतालगतच्या घरात नेऊन गादा गावात सूचना दिली. माहिती मिळताच गादाचे सरपंच तेजराम गोरले, होमराज गोरले व शेतमालक राजेश यादव यांनी गंभीर महिलांना कामठीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. कचराबाई मेश्राम व शीला घरडे यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघींनाही नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविले. किरकोळ जखमी असलेली दुर्गा गोरले हिच्यावर कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘लोकमत’ प्रतिनिधीने गादा गावात भेट दिली असता, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले आढळले. शेतीला लागून सरस्वताबाई दामोदर भोंडेकर यांचे घर असून त्यांनी सांगितले की, सकाळी ११.३० वाजता स्वयंपाकघरात जेवण करीत असताना घरावरील कवेलूला बंदुकीची गोळी लागली. सदर गोळी कवेलूमध्ये फसल्याने पुढील अनर्थ टळला.
विशेष म्हणजे, २० वर्षांपूर्वी सरस्वताबार्इंच्या डोक्याला गोळी लागल्याने त्या डोक्याच्या आजाराने त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

नागरिकांमध्ये दहशत
गेल्या ५० वर्षांपासून गादा गावातील नागरिक गोळीबाराच्या दहशतीत जगत आहेत. सन १९७५ ला पांडुरंग शेंडे यांना गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. २० वर्षांपूर्वी सरस्वती भोंडेकर या महिलेस गोळीमुळे जखमी व्हावे लागले. शिवाय, मिलटरी फायरिंग रेंजमध्ये सैनिक प्रशिक्षणादरम्यान गादा गावातील नागरिकांसह अनेकदा जनावरे बंदुकीच्या गोळीने जखमी झाली आहेत. गोळीबाराचा आवाज कानी पडताच ग्रामस्थांना काम सोडून घरात आश्रय घ्यावा लागतो. या समस्येबाबत गादा येथील नागरिकांनी अनेकदा मुख्यमंत्री, पालकमंत्री व केंद्रीय मंत्र्यांना लेखी निवेदन देऊन फायरिंग रेंजमधील गोळीबाराची समस्या दूर करण्याची मागणी केली. परंतु त्याकडे कुणीच लक्ष दिले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यातच बुधवारी ही घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Two women were injured in the firing range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.