‘ऑरेंज सिटी स्ट्रीट’च्या कामाचा पत्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2022 04:02 PM2022-01-23T16:02:39+5:302022-01-23T16:18:49+5:30
प्रस्तावित ३०.३९ हेक्टर क्षेत्रातील लंडन स्ट्रीटचे फक्त नाव बदलवून संत्रानगरीच्या नावावर लंडन ऑरेंज सिटी स्ट्रीट ठेवण्यात आले. त्यानंतरही काम गतीने सुरू झाले नाही. दोन वर्षांत मॉलचा जेमतेम जोता तयार झाला आहे.
राजीव सिंह
नागपूर : महापालिकेत एका दशकात भाजपच्या सत्तेच्या दोन टर्म पूर्ण झाल्या. मात्र प्रस्तावित ३०.३९ हेक्टर क्षेत्रातील लंडन स्ट्रीटचे फक्त नाव बदलवून संत्रानगरीच्या नावावर लंडन ऑरेंज सिटी स्ट्रीट ठेवण्यात आले. त्यानंतरही काम गतीने सुरू झाले नाही. दोन वर्षांत मॉलचा जेमतेम जोता तयार झाला आहे.
साडेचार हजार कोटींहून अधिकचा हा प्रकल्प असल्याचा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे. यातून महापालिकेला कोट्यवधींचे उत्पन्न अपेक्षित आहे. असे असले तरी प्रकल्पांतर्गत जयप्रकाश नगर चौक येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स व मॉलचे काम जोत्यापर्यंतच झाले आहे. दोन वर्षांपूर्वी महामेट्रोने हे काम केले होते. नंतर महापालिकेने खासगी सहभागातून प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. पण प्रकल्पाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही.
मौजा सोमलवाडा, खामला, भामटी, टाकळी, जयताळा परिसरांत प्रस्तावित ऑरेंज सिटी स्ट्रीटमध्ये निवासी, व्यावसायिक संकुलासह आयटी पार्क, ग्रीन झोन, भाजीपाला मार्केट, मेडिकल झोन, आदींचा यात समावेश आहे. वर्धा रोड ते सोमलवाडा, खामला, भामटी, परसोडी, टाकणी, जयमाळा टी पॉॅईंटपर्यंत ५.५० कि.मी.मध्ये १०७५९८४. ४० चौ. मीटर क्षेत्रात बांधकाम प्रस्तावित आहे. प्रकल्प मोठा असल्याने २१ भागांत विभाजित केला आहे. यात ६० निवासी व १३ व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे. हॉफिज कॉट्रॅक्टर प्रकल्पाचे सल्लागार आहेत. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी यांच्या कार्यकाळात लंडन स्ट्रीटचे ऑरेंज सिटी स्ट्रीट असे नामकरण करण्यात आले. ऑगस्ट २०१४ मध्ये या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली. प्रकल्पाच्या पहिल्या भागातील मॉलचे फेब्रुवारी २०१९ मध्ये भूमिपूजन झाले.
जयप्रकाशनगर येथे ३३०८ चौ. मी. क्षेत्रात मॉल
जयप्रकाशनगर चौकाजवळ ऑरेंज सिटी मलटी युटिलिटी शॉपिंग मॉल व कार्यालयाचे जोत्यापर्यंत काम झाले आहे. पहिल्या टप्प्यात ३३०८ चौ. मीटर क्षेत्रात ३.२१३ एफएसआयसह १०६२९.६३ चौरस मीटर क्षेत्रात बांधकाम करणार आहे. महामेट्रोच्या माध्यमातून या बांधकामाला सुरुवात झाली होती. नंतर महापालिकेने खासगी विकसकाच्या माध्यमातून प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. निविदा काढण्यात आली. ५५.५५ कोटींच्या या मॉलचे बांधकाम करण्याची जबाबदारी प्रफुल्लवेद कंपनी सोपविली जाणार आहे.
पाचव्या प्लॉटवर नऊमजली इमारत
ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाची योजना महापालिकेने तयार केली आहे. याअंतर्गत पाचव्या क्रमांकाच्या प्लॉटवर नऊ मजली व्यावसायिक संकुल उभारले जाणार आहे. यात दोन तळमजल्यावर पार्किंग राहणार आहे. ७५३३.५९ चौ. मीटर क्षेत्रात ४.९५ एफएसआयनुसार इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. बिल्टअप एरिया ३७२९१.२८ चौ. मीटर राहणार आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल.
प्रकल्पावर दृष्टिक्षेप
-३०.४९ हेक्टर क्षेत्र २१ प्लॉटमध्ये विभाजित करून प्रकल्प राबविणार
-५.५० कि.मी. लांबीच्या मार्गावर व्यावसायिक व खासगी वापरासाठी इमारती, आयटी पार्क, मेडिकल झोन व मार्केट
- १०७५९८४.४० चौ. मीटर बिल्टअप एरिया राहणार
- ६० निवासी व १३ व्यावसायिक इमारती राहणार