खुनातून निर्दोष मात्र दुखापतीत दोन वर्षे कारावास
By admin | Published: December 29, 2016 02:49 AM2016-12-29T02:49:25+5:302016-12-29T02:49:25+5:30
अनैतिक संबंधाच्या संशयावरून टाटा मॅजिकचालकाच्या झालेल्या खुनातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने
टाटा मॅजिक चालकाचे खून प्रकरण
नागपूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून टाटा मॅजिकचालकाच्या झालेल्या खुनातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष सुटका केली. मात्र दुखापतीचा गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
बंडू बापूराव बिलनकर (४६) रा. नवीन बिना तहसील सावनेर, असे आरोपीचे नाव असून राजू ज्ञानोबा बनकर रा. खापरखेडा, असे मृताचे नाव होते. राजू हा टाटा मॅजिक चालवून प्रवासी वाहतूक करायचा. प्रकरण असे की, आरोपी बंडू बिलनकर याला राजूचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे बंडूने अनेकदा राजूच्या घरी जाऊन समजावले होते. त्यांचे भांडणही झाले होते. ७ डिसेंबर २०१३ रोजी राजू हा आपली एमएच-४०-एन-७०१२ क्रमांची टाटा मॅजिक घेऊन कामावर गेला होता. घरी परतण्याची वेळ होऊनही तो घरी परतला नव्हता. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मोहल्ल्यात राहणारा तिरथराम वाघमारे याने राजूच्या घरी जाऊन त्याची पत्नी शीतल राजू बनकर हिला बंडू बिलनकर हा श्याम मंगल कार्यालयासमोर राजूला मारहाण करीत असल्याचे सांगितले होते. शीतलने घटनास्थळ गाठले असता बंडू हा राजूला काठीने मारहाण करताना दिसताच तिने बंडूला बाजूला केले होते. राजूच्या नाकातोंडातून रक्त निघताना पाहून तिने शेजाऱ्यांच्या मदतीने आपल्या पतीला कामठी येथील खासगी इस्पितळात नेले होते. तेथील डॉक्टरांनी तपासून राजूला मृत घोषित केले होते. खापरखेडा पोलिसांनी भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. कोहरे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीला भादंविच्या ३२४ कलमांतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास, तीन हजार रुपये दंड आणि भादंविच्या कलम ३०२ मधून निर्दोष सुटका केली.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे तर आरोपीच्या वतीने अॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक डी. एन. म्हात्रे, सहायक फौजदार दिलीप कडू, अरुण भुरे, हेड कॉन्स्टेबल अशोक शुक्ला आणि भवानीप्रसाद मिश्रा यांनी सहकार्य केले.