दोन वर्षांनंतर शाळांत सुरू झाला किलबिलाट; विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 07:36 PM2022-06-29T19:36:26+5:302022-06-29T19:36:50+5:30
Nagpur News कोरोना संसर्गाने दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा बुधवारी वाजली आणि शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेला.
भंडारा : कोरोना संसर्गाने दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा बुधवारी वाजली आणि शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेला. शाळेत जाण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी शाळेत पोहोचले आणि एकच किलबिलाट सुरू झाला. कुठे ढोल-ताशांचा गजर तर कुठे गुलाबपुष्प उधळून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षांसह शिक्षण सभापती आणि अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी दिल्या. दोन वर्षांनंतर जीवलग सवंगडी मिळाल्याने दिवसभर गप्पांचा फड रंगला होता.
कोरोना संसर्गामुळे गत दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. काही शाळा सुरू करण्याचा प्रयत्न झाला; परंतु कोरोना नियमांचे कठोर पालन करावे लागत होते. परिणामी, शाळांमध्ये किलबिलाटच थांबला होता. मात्र, यावर्षी कोरोना संसर्ग नसल्याने पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला. गत महिनाभरापासून शाळा प्रवेशोत्सवाची तयारी सुरू झाली. दि. २७ जून रोजी शिक्षक शाळेत पोहोचले. मात्र विद्यार्थ्यांसाठी २९ जूनचा मुहूर्त ठरविण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी जिल्ह्यातील १३१३ शाळांमध्ये घंटा वाजली. विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत पोहचले. त्याठिकाणी शिक्षक, गावकरी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे सांग्र संगीत स्वागत करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष पोहोचले कोंढाच्या शाळेत
भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे बुधवारी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पवनी तालुक्यातील कोंढा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पोहोचले. त्याठिकाणी आयोजित शाळापूर्व तयारी अभियान मेळाव्याला उपस्थित राहून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी तेजस्विनी सुरेश बावनकर हिचा सत्कार केला.