दाेन वर्षाची ट्रेनिंग, हवाई उड्डानाचे प्रशिक्षण शुन्य तास
By निशांत वानखेडे | Published: October 3, 2024 06:06 PM2024-10-03T18:06:34+5:302024-10-03T18:08:16+5:30
नागपूर फ्लाइंग क्लबचा भाेंगळ कारभार : विद्यार्थ्यांचे तीन दिवसांपासून उपाेषण
नागपूर : महाज्याेतीची परीक्षा उत्तीर्ण करून नागपूर फ्लाइंग क्लबमध्ये दाेन वर्षापासून प्रशिक्षण घेणारे १४ विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपाेषणाला बसले आहेत. कमर्शियल पायलट लायसन्स (सीपीएल) हा दीड वर्षाच्या काेर्ससाठी या विद्यार्थ्यांनी दाेन वर्षे घालवूनही हवाई उड्डानाचे शुन्य तास, एक तास, दाेन तास असे नगण्य प्रशिक्षण झाले. अशा नगण्य अनुभवाच्या विद्यार्थ्यांना वैमानिक म्हणून काेण नाेकरी देणार? या नैराश्याने विद्यार्थ्यांनी उपाेषण सुरू केले आहे.
संविधान चाैक येथे तीन दिवसापासून उपाेषणाला बसलेल्या १४ पैकी काही विद्यार्थ्यांची प्रकृती नाजुक झाली आहे. महाज्याेतीतर्फे सीपीएल या काेर्ससाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २० विद्यार्थ्यांचे १ नाेव्हेंबर २०२२ पासून नागपूर फ्लाइंग क्लब येथे वैमानिक प्रशिक्षण सुरू झाले. हे प्रशिक्षण १८ महिन्याचे असते. प्रशिक्षणात २०० तास हवाई उड्डाण होणे आवश्यक आहे. हवाई उड्डाणतास पूर्ण झाल्यानंतरच सी. पी. एल. अभ्यासक्रम पूर्ण होतो, यानंतरच विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. परंतु मागील २३ महिन्यात विद्यार्थ्यांचे अतिशय नगण्य तास हवाई उड्डाण प्रशिक्षण झाले आहे. क्लबचे ट्रस्टी असलेले विभागीय आयुक्त, नागपूर फ्लाईंग क्लब, महाज्योती आणि विद्यार्थी व पालक यांच्या अनेकदा बैठका झाल्यात परंतु विद्यार्थ्यांचे हवाई उड्डाण तास अजूनही पूर्ण झाले नाहीत. नागपूर फ्लाईंग क्लब २३ महिन्यातही विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगळे प्रशिक्षण केंद्र देण्यात यावे व तात्काळ हे प्रशिक्षण पूर्ण करावे, अशी मागणी उपाेषणकर्त्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांचे किती प्रशिक्षण
अविनाश येरणे, शुभम गोसावी व स्वप्नील चव्हाण शुन्य तास, रोहित बेडवाल एक तास, विनय भांडेकर ३ तास, सानिका निमजे ६ तास, भक्ती पाटील ११ तास, जयेश देशमुख व तेजस बडवार १५ तास, ऋतुंबरा देवकाते १६ तास, हार्दिका गोंधले २० तास, विश्वनाथ जाधव २५ तास, प्रणव सावरकर २८ तास, स्नेहल खैरनार ३५ तास.
२०० तास प्रशिक्षण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकत नाही. या विद्यार्थ्यांना काेण नाेकरी देणार? दाेन वर्षे वाया गेली, तरीही शासन दखल घेत नाही.
उमेश कोर्राम, संयोजक, ओबीसी युवा अधिकार मंच.