दोन तरुणांना चिरडले
By admin | Published: September 22, 2016 03:05 AM2016-09-22T03:05:28+5:302016-09-22T03:05:28+5:30
भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला.
ट्रकची मोटरसायकलला धडक : मौदी फाट्याजवळ अपघात
देवलापार : भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात देवलापार पोलीस ठाण्यांतर्गत पवनी नजीकच्या मौदी फाट्यापुढे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास झाला. या अपघातामुळे संतापलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत पोलीसही पोहोचले. त्यामुळे नागरिकांचा संतापाला आवर घालता आला.
मृत तरुणांकडे आढळलेल्या कागदपत्रांवरून सागर कुंडलिक येवतकर (३०, रा. अमरावती) व सुरेश इसारी वानखेडे (३५, रा. येरला, जि. भंडारा) अशी नावे असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली. ते दोघेही एमएच-२७/बीएन-५३६८ क्रमांकाच्या मोटरसायकलने नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ ने देवलापारकडे येत होते. दरम्यान मौदी फाट्यापुढे सीजी-०४/जे-९२५९ क्रमांकाच्या ट्रकने मोटरसायकलला जबर धडक दिली.
या अपघातानंतर मोटरसायकल ट्रकमध्ये अडकल्याने मोटरसायकलसह दोघांनाही काही अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची ही माहिती देवलापार पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून आरोपी ट्रकचालक रनतेश रामलाल यादव (१९, रा. संजय वॉर्ड, शिवनी, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. तसेच ट्रक पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास ठाणेदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव पुजारी करीत आहे. (प्रतिनिधी)