मकरधोकडा तलावात दोन तरुणांना जलसमाधी; एकाचा मृतदेह गवसला, दुसऱ्याचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 11:27 AM2023-08-08T11:27:14+5:302023-08-08T11:27:37+5:30
महिनाभरातील दुसरी घटना
उमरेड (नागपूर) : तालुक्यातील मकरधोकडा तलावात १३ जुलै रोजी बुटीबोरी येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेला महिनासुद्धा झाला नाही. अशातच सोमवारी (दि. ७) दुपारी ३ वाजताच्या सुमारास पुन्हा दोन तरुणांना पोहण्याचा मोह आवरता न आल्याने आपला जीव गमवावा लागला. आयुष ईश्वर सातपुडके (२२, रा. भिवी, ता. भिवापूर), निखील मुकुंदा भगत (२५, रा. नाड, ता. भिवापूर) अशी तलावात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. मकरधोकडा तलावात असलेल्या नगरपालिकेच्या पंपहाऊसलगत ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली.
यापैकी आयुष सातपुडके या तरुणाचा मृतदेह सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मिळाला. निखील भगत या तरुणाचा सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत शोध सुरू होता. पंपहाऊसच्या विद्युतचा आधार घेण्यात आला. अखेरीस शोधमोहीम थांबवण्यात आली.
मृत आयुष सातपुडके आणि त्याचा चुलत भाऊ प्रज्वल दिलीप सातपुडके (२४, दोघेही रा. भिवी (झमकोली) तसेच मृतक निखील भगत व अनिकेत विजय कांबळे (२६, रा. सालेभट्टी, ता. भिवापूर) हे चौघे साेमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मकरधोकडा तलाव येथे दोन दुचाकीने पोहोचले.
चौघांनीही तलाव परिसरात आनंद साजरा केला. दरम्यान, मृत आयुष आणि निखील दोघेही तलावाच्या काठावर कपडे काढून तलावात उतरले. दोघांनाही पोहता येत नव्हते. शिवाय खोल पाण्याचाही अंदाज आला नाही. अशातच दोघेही खोल खड्ड्यात बुडाले. काही अंतरावर असलेल्या अन्य दोन मित्रांना ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करीत वाचविण्यासाठी धावपळ केली. तत्पूर्वी दोघेही बुडाले होते. दरम्यान, ग्रामहित मच्छीमार मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या सदस्यांनी बुडालेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आयुषचा मृतदेह गवसला. घटनेची वार्ता कळताच चौघांच्याही आप्तस्वकीयांनी घटनास्थळ गाठले होते. दोन्ही मृत तरुण अविवाहित असून, दोघांचीही काैटुंबिक पार्श्वभूमी हलाखीची आहे.
दोघांनाही पाण्याचा अंदाज घेता आला नाही. याठिकाणी खोल खड्डा आणि मोठे दगड आहेत. दोघांनाही पोहता येत नव्हते. स्थानिक संस्थेच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.
- प्रमोद घोंगे, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन, उमरेड.