काेलार नदीत दाेघे तरुण वाहून गेले, भानेगाव शिवारातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:30 PM2023-07-17T12:30:06+5:302023-07-17T12:30:48+5:30
मासाेळ्या पकडताना आले प्रवाहात
खापरखेडा (नागपूर) : भानेगाव (ता. सावनेर) शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रात मासाेळ्या पकडताना पाच मित्रांपैकी दाेघांचा ताेल गेल्याने ते प्रवाहात आले आणि वाहून गेले. ही घटना रविवारी (दि. १६) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. सायंकाळी अंधार हाेईपर्यंत त्या दाेघांचेही शाेधकार्य सुरू हाेते, अशी माहिती ठाणेदार (प्रभारी) दीपक कांक्रेडवार यांनी दिली.
संजयकुमार शाह (२०, रा. सिसवा, जिल्हा शिवा, बिहार) आणि श्रवणकुमार शाह (२०, रा. खानपूर, बिहार) अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. या दाेघांसह शेषनाग कुमार शाह (२२), अमितकुमार शाह (२३) व शैलेंद्रकुमार शाह (२८) सर्व रा. बिहार असे पाच जण भानेगाव येथील वेकाेलिच्या काेळसा खाणीत श्रीहरी कृष्ण कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला आले हाेते.
रविवारी सुट्टी असल्याने पाचही जण भानेगाव शिवारातील कन्हान नदीच्या पात्रात मासाेळ्या पकडण्यासाठी गेले. मासाेळ्या पकडत असताना संजयकुमार व श्रवणकुमार या दाेघांचा ताेल गेल्याने ते पाण्यात पडले आणि लगेच प्रवाहात आल्याने वाहून गेले. इतर तिघांना पाेहता येत नसल्याने ते पाण्याबाहेर निघाले. दाेघेही वाहून गेल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली.
शाेधकार्य सुरू
माहिती मिळताच ठाणेदार (प्रभारी) दीपक कांक्रेडवार यांनी घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने शाेधकार्य सुरू केले. सायंकाळी अंधारामुळे शाेधकार्य थांबविण्यात आले हाेते. कामठी व सावनेर तहसील प्रशासनालाही खापरखेडा पाेलिसांनी सूचना दिली. साेमवारी (दि. १७) सकाळी पुन्हा शाेधकार्य सुरू करण्यात येणार असून, एनडीआरएफच्या टीमची मदत घेण्यात येणार असल्याचे दीपक कांक्रेडवार यांनी सांगितले.