हे तर ‘पलटूराम’ सरकार; शिवसेनेच्या भगव्यात भेसळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 10:19 PM2020-11-20T22:19:22+5:302020-11-20T22:19:44+5:30
Devendra Fadanvis Nagpur News राज्यातील महाविकास आघाडी शासनाने जनतेची घोर फसवणूक केली आहे. लोकांना खोटी आश्वासने देऊन वेळ आल्यावर सरकारकडून ‘यू टर्न’ घेण्यात येतो. हे तर ‘पलटूराम’ सरकारच आहे, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने जनतेची घोर फसवणूक केली आहे. लोकांना खोटी आश्वासने देऊन वेळ आल्यावर सरकारकडून ‘यू टर्न’ घेण्यात येतो. हे तर ‘पलटूराम’ सरकारच आहे, या शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले. नागपुरात आयोजित कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
महाविकास आघाडीच्या शासनात तीन प्रमुख पक्ष आहेत. मात्र काँग्रेसच्या मंत्र्यांना कुणीच विचारत नसल्याचे चित्र आहे. शिवसेनेला तर बाळासाहेबांच्या भगव्याचा विसर पडला आहे. आता सेनेचा भगवा खरा राहिला नसून त्यात भेसळ झाली आहे. काश्मीरमध्ये चीनच्या मदतीने कलम ३७० परत आणू असे म्हणणाऱ्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या व गुपकारांचे समर्थन करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून ते सत्तेत बसले आहेत. शिवसेना भगव्याचा अपमानच करत आहे, असे फडणवीस म्हणाले.
वीज बिलांच्या चौकशीचे सरकारचे इशारे हास्यास्पद आहेत. अगोदर म्हणाले वीज बिल माफ करू आणि आता लक्षात आलं देता येत नाही म्हणून चौकशी करू म्हणतात. त्यांना जी चौकशी करायची आहे ती करावी. सरकार आता थोबाडावर पडले आहे. चौकशीत लक्षात येईल की थकबाकी ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील आहे.
मुंबईत भाजप स्वबळावर लढणार
दरम्यान, फडणवीस यांना मनसेशी युतीसंदर्भात विचारले असता त्यांनी मुंबईत भाजप स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले. ‘बीएमसी’च्या निवडणुकीत भाजप मनसेसोबत हातमिळावणी करू शकते, या चर्चेवर त्यांनी पडदा पाडला.