नयाकुंड गावाजवळील ‘यू टर्न’ धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:24+5:302021-05-07T04:09:24+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : आमडी(फाटा)-पारशिवनी मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले असून, या मार्गाला नयाकुंड (ता. पारशिवनी) गावाजवळ ‘यू’ आकाराचे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : आमडी(फाटा)-पारशिवनी मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले असून, या मार्गाला नयाकुंड (ता. पारशिवनी) गावाजवळ ‘यू’ आकाराचे वळण देण्यात आले आहे. या मार्गावर वाहने सुसाट धावत असल्याने ते वळण अत्यंत धाेकादायक ठरत आहे. तिथे वेळीच उपाययाेजना करणे आवश्यक असताना त्यासाठी प्रशासन माेठ्या अपघाताची प्रतीक्षा करीत आहे काय, असा प्रश्न या भागातील नागरिकांसह वाहनचालकांनी केला आहे.
या मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम तीन वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आले. या कामाचे कंत्राट एच. जी. इन्फ्रा नामक कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले हाेते. रुंदीकरणानंतर नयाकुंड गावाजवळ असलेल्या वळणावर राेज अपघात हाेत आहेत. त्यामुळे हे वळण सरळ करण्याबाबत स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, या मागणीकडे गांभीर्याने बघितले नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
या मार्गाच्या कडेला नयाकुंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दुकाने, हॅण्डपंप व घरे असल्याने या राेडवरून विद्यार्थ्यांसाेबतच महिला व इतर नागरिकांचा नेहमीच राबता असताे. नयाकुंड हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने पारशिवनी तालुक्यातील माहुली, चिचभुवन, गुंडरी, पाली उमरी, घुगसी, मेहंदी, बखारी यासह अन्य गावांमधील नागरिकांना नयाकुंड मार्गेच रहदारी करावी लागते. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. येथील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हे वळण सरळ करावे तसेच या ठिकाणी दुभाजक तयार करून पथदिवे, इंडिकेटर, सूचना फलक लावावे व गतिराेधक तयार करावे, अशी मागणी अनिकेत निंबोने, चंद्रशेखर शेरकी, किशोर निंबोणे, दीपक वर्मा, बंटी निंबोणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
...
आश्वासने हवेत विरली
नयाकुंड गावाजवळील या वळणाला नागरिकांचा सुरुवातीपासून विराेध हाेता. या मार्गाचे काम सुरू असताना नागरिकांनी या वळणाला विराेध करीत मार्गाचे काम बंद पाडले हाेते. मात्र, आंदाेलकांना प्रत्येक वेळी आश्वासने देऊन शांत करण्यात आले. नेते व अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत त्यांना दिलेल्या आश्वासनांची अद्यापही पूर्तता केली नाही. शिवाय, या ठिकाणी प्रभावी उपाययाेजना केल्या नाहीत. परिणामी, या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये काहींना जीव गमवावा लागला तर काहींना जखम सहन कराव्या लागल्या.
...
घराजवळ उलटला ट्रक
हा मार्ग नयाकुंड गावालगत असून, या मार्गाच्या वळणावर दाेन्ही बाजूंनी घरे असल्याने नागरिकांसह मुलांची वर्दळ असते. त्यातच चालक त्यांच्या वाहनांचा वेग कमी न करता सुसाट पळतात आणि अपघात हाेतो. या वळणावर साेमवारी (दि. ३) एमएच-४०/बीएल-९७०५ क्रमांकाचा काेळसा घेऊन जात असलेला ट्रक घराजवळ उलटला. परिसरातील नागरिक लगेच बाजूला झाल्याने प्राणहानी टळली. बुधवारी (दि. ५) या वळणावर कांदे घेऊन जाणारा यूपी-७०/जेटी-७९९१ क्रमांकाचा ट्रक उलटला. येथे अपघात वाढत असतानाही प्रशासनाला जाग येत नाही.