नागपूर जिल्ह्यात ४९ हजार विद्यार्थी आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:01 AM2020-02-22T11:01:50+5:302020-02-22T11:03:07+5:30
राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात ४९ हजार ३४८ विद्यार्थी किरकोळ आजारग्रस्त आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात ६ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ३ लाख ९५ हजार ८३६ विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासण्यात आले. यात ४९ हजार ३४८ विद्यार्थी किरकोळ आजारग्रस्त आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम राज्यात फेब्रुवारी २००८ पासून राबविला जात होता. या कार्यक्रमात वय वर्ष ६ ते १८ वयोगटातील शहरी व ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात होती. शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या यशानंतर राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे केंद्रशासनाद्वारे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यामध्ये लहान मुलांमधील जन्मजात विकृती, कमतरतेमुळे होणारे आजार, वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करुन उपचाराचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील २ हजार ५४४ शाळांमध्ये पथकाने भेटी दिल्या. तेथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली. जवळपास ३ लाख ९५ हजार ८३६ विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासण्यात आले.
यातील ४९ हजार ३४८ विद्यार्थ्यांना किरकोळ आजार असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर७ नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या शाळांमध्ये पथकाने ४५ हजार ३३१ विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यात ५ हजार ६७० विद्यार्थी किरकोळ आजारग्रस्त होते.