तिमिरातून तेजाकडे जाणारे ‘उदय’

By admin | Published: February 20, 2017 02:25 AM2017-02-20T02:25:21+5:302017-02-20T02:25:21+5:30

नियतीचा फटका कधी कुणाला बसेल हे सांगणे शक्य नाही. पण या क्रूर नियतीपुढे मान न तुकवता, आव्हानांचा सामना करून डॉ. उदय बोधनकर यांनी विजय मिळविला.

'Uday' going from Temi to Tejir | तिमिरातून तेजाकडे जाणारे ‘उदय’

तिमिरातून तेजाकडे जाणारे ‘उदय’

Next

वेदप्रकाश मिश्रा : ‘तिमिरातून उदयाकडे’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर : नियतीचा फटका कधी कुणाला बसेल हे सांगणे शक्य नाही. पण या क्रूर नियतीपुढे मान न तुकवता, आव्हानांचा सामना करून डॉ. उदय बोधनकर यांनी विजय मिळविला. दुर्दम्य आशावाद, अतूट धैर्य आणि प्रचंड इच्छाशक्तीमुळेच हे शक्य होऊ शकले. प्राणांतिक वेदनाही त्यांनी हसत हसत सहन केल्या. त्यांच्या पुढे मृत्यूही हरला. तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या या प्रवासाचे वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकातून केले, हे पुस्तक प्रत्येकाला जगण्याची उमेद देणारे ठरेल, असे प्रतिपादन कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी येथे केले.
डॉ. उदय बोधनकर यांच्या ‘तिमिरातून उदयाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध लेखिका सुप्रिया अय्यर, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. उदय माहोरकर, डॉ. विकास बिसने, डॉ. अनुप मरार उपस्थित होते.
त्यांच्या या पुस्तकाला आत्मचरित्र न म्हणता, एक आत्मकथन किंवा आत्मचिंतन म्हणणे योग्य ठरेल, असेही डॉ. मिश्रा म्हणाले. सुप्रिया अय्यर म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे आत्मचरित्र नाही किंवा ती कादंबरी नाही. हे एक तीव्र संवेदनाचा लेखाजोखा आहे. या सबंध लेखन प्रवासात डॉ. बोधनकर हे जगण्यावर अन् त्यासोबतच यशस्वी होण्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे दिसून आले. मृत्यूला स्पर्श करून आल्यावरही ते तेवढ्याच ताकदीने उभे आहेत, याचा मला मनस्वी आनंद आहे.
डॉ. बोधनकर म्हणाले, प्रत्यक्ष मृत्यूलाही परतवून लावण्याचं बळ मला देणाऱ्या अनेक आप्तेष्टांचे, मित्रांचे व अनेक डॉक्टर मित्रांचे हे पुस्तक आहे. एका साध्या चुकीतून जीवनाची बिघडलेली लय, या चुकीचे दशावतार दाखविताना नियतीने कुठलीच न सोडलेली कसर, मित्रांचे व आप्तांचे प्रयत्न, याचा हा लेखाजोखा आहे. मृत्यूचे दार अनेकदा ठोठावूनही माझा जणू पुनर्जन्म झाल्याचा हा प्रवास आहे. यावेळी डॉ. माहोरकर यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बोधनकर यांना वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रवास उलगडला. डॉ. अविनाश गावंडे यांनी रुग्णालयातील त्या तीन महिन्यांच्या सर्वांच्या प्रयत्नांचे प्रसंग उभे केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार मकरंद कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. संजय जयस्वाल, डॉ. एस. डब्ल्यू चोरघडे, डॉ. आर. के. खेमका, डॉ. मदन वराडे, डॉ. सी. एम. बोकडेआदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: 'Uday' going from Temi to Tejir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.