राष्ट्रवादीच्या सघर्ष सभेला पवारांसोबत उद्धव ठाकरे, दिग्वीजय सिंह येणार; अनिल देशमुख यांची माहिती
By कमलेश वानखेडे | Published: December 6, 2023 05:29 PM2023-12-06T17:29:09+5:302023-12-06T17:30:03+5:30
या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह उपस्थित राहणार आहेत.
नागपूर : राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा १२ डिसेंबर रोजी नागपुरात पोहचणार असून पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले, १२ डीसेंबर रोजी दुपारी २ वाजता झिरोमाईल येथे होणाऱ्या या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. संजय राउत, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील खासदार, आमदार व वरीष्ठ नेत्यांना या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
अजितदादांसोबत गेलेल्यांची घरवापसी होईल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार द्विधा मनस्थितीत आहे. ते आमदार स्वखुशीने गेलेले नाहीत. ते गणेश मंडळासारखे अजितदादा मित्र मंडळ आहे. त्यांच्यासोबत गेलेल्या बहुतांश आमदारांची विधानसभा निवडणुकीपूर्वी घरवासी होईल, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. गेल्या अधिवेशनात आमदारांना व्हीप जारी करण्याची वेळ आली नव्हती. यावेळी तशी वेळ आली तर निर्णय घेऊ, असेही देशमुख यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.