रामटेक, हिंगणा, कामठीसाठी उद्धव ठाकरे गट आग्रही; १२ पैकी ४ जागांसाठी पेटवली ‘मशाल’

By कमलेश वानखेडे | Published: August 17, 2024 08:57 AM2024-08-17T08:57:36+5:302024-08-17T08:59:19+5:30

लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशी लढत व्हायची.

Uddhav Thackeray group demands for Ramtek Hingna Kamthi and Nagpur | रामटेक, हिंगणा, कामठीसाठी उद्धव ठाकरे गट आग्रही; १२ पैकी ४ जागांसाठी पेटवली ‘मशाल’

रामटेक, हिंगणा, कामठीसाठी उद्धव ठाकरे गट आग्रही; १२ पैकी ४ जागांसाठी पेटवली ‘मशाल’

कमलेश वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: जिल्ह्यातील रामटेक, हिंगणा, कामठी व नागपूर शहरातील पूर्व नागपूर या चार मतदारसंघांसाठी उद्धवसेनेने आतापासूनच ‘मशाल’ पेटविली आहे. नागपूर जिल्ह्यात १२ पैकी किमान तीन जागा मिळाव्यात, यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत. महाविकास आघाडीतून जिल्ह्यात एकही जागा मिळणार नसेल तर आम्ही काँग्रेस व शरद पवार गटाच्या पालख्याच वाहायच्या का, असा सवाल उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला आहे.

लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशी लढत व्हायची. शिवसेनेतील फुटीनंतर भाजपने ही जागा शिंदेसेनेला सोडली. पण, काँग्रेसने ही जागा उद्धवसेनेला दिली नाही. त्यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची उद्धवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती व विधानसभा निवडणुकीत रामटेकची जागा उद्धवसेनेला सोडण्याचा शब्द दिला गेला होता, असा दावा केला जात आहे.

रामटेकमध्ये गेल्या २५ वर्षांपासून काँग्रेसचा सतत पराभव होत आहे. हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. २०१९मध्ये आशिष जयस्वाल अपक्ष लढले तरी शिवसेनेच्या मतांवर ते विजयी झाले, असा युक्तिवाद करीत उद्धवसेना आपला दावा भक्कम करू पाहात आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी हिंगणा मतदारसंघ हा कळमेश्वर मतदारसंघ होता. त्यावेळी युतीमध्ये ही जागा शिवसेना लढवायची. गेल्या १५ वर्षांपासून हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव होत आहे. शरद पवार गटात उमेदवारीवरून मतभेद आहेत. ही संधी साधत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचे काँग्रेसचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बदल म्हणून जागा उद्धवसेनेला सोडावी, यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत. 

...तर कार्यकर्त्यांनी काय करायचे?

  • कामठीतही २५ वर्षांपासून काँग्रेसचा उमेदवार पराभूत होत आहे.
  • उद्धवसेनेला दोन - तीन जागाही मिळणार नसतील तर   कार्यकर्त्यांनी काय करायचे, जिल्ह्यात उद्धवसेनेची शाखा सुरू ठेवायची की नाही? अशी संतप्त भाषा आता पदाधिकारी करू लागले आहेत.

Web Title: Uddhav Thackeray group demands for Ramtek Hingna Kamthi and Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.