आम्ही अदानींना प्रश्न विचारले, मग चमचे का वाजू लागले?; ठाकरेंचा भाजपला बोचरा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 04:16 PM2023-12-18T16:16:20+5:302023-12-18T16:21:59+5:30
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काढलेला मोर्चा विकासविरोधी असून बिल्डर लॉबीकडून सुपारी घेऊन त्यांनी ही भूमिका घेतल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता.
नागपूर : धारावी पुनर्विकासावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजप असा जोरदार राजकीय सामना रंगत आहे. या पुनर्विकासाच्या माध्यमातून सरकार केवळ अदानी समूहाच्या फायद्याचा विचार करत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं नुकताच मुंबईत मोर्चा काढला होता. मात्र हा मोर्चा विकासविरोधी असून बिल्डर लॉबीकडून सुपारी घेऊन उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका घेतल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. या आरोपाला आज उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"आम्ही अदानींना प्रश्न विचारले, मात्र चमचे का वाजू लागले? धारावीच्या माध्यमातून आमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे निर्णय घेणार असाल, तर ते आम्ही कसे सहन करू? या सरकारसारखा उघडा नागडा कारभार आधीच्या कुठल्याच सरकारने महाराष्ट्रात केलेला नाही. धारावीतील मोर्च्याला आम्ही माणसं चंद्रावरून आणली होती, पण मुद्दा मुंबईचा होता. माणसांवर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोला," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारलं आहे.
आरक्षणावरूनही टीकास्त्र
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून या प्रश्नावरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. "ज्यांनी शिवाजी महाराजांच्या चरणाची शपथ घेतली त्यांनी चर्चा करण्यापेक्षा इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या. कोणत्याही समाजाचं तसूभरही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण कसे देणार आहात, हे तुम्ही आम्हाला सांगायला हवं, चर्चा कसली करताहेत?" अशी टीका उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
दरम्यान, आमचा सुतराम संबंध नसताना तुम्ही एसआयटी लावत असाल, तर मग आमच्याकडे तुमच्याविरोधात पुरावे असूनही तुम्ही कारवाई का करत नाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.