उद्धव ठाकरेंना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन होतो का? भाजप प्रदेशाध्यक्षांचा सवाल
By योगेश पांडे | Published: December 8, 2023 05:07 PM2023-12-08T17:07:59+5:302023-12-08T17:09:08+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे.
योगेश पांडे,नागपूर : कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा मुलगा प्रियांककडून स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. विधीमंडळ अधिवेशन सुरू असताना भाजपतर्फे याविरोधात आंदोलन करण्यात आले. विरोधकांच्या इंडी आघाडीत काँग्रेससह सामील असणारे उद्धव ठाकरे आणखी किती वेळा गप्प बसणार. त्यांना स्वातंत्र्यवीराचा वारंवार होणारा अपमान सह होतो का, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला.
भाजपतर्फे महाल येथील टिळक पुतळा चौकाजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी बावनकुळे यांच्यासोबतच भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, शहराध्यक्ष बंटी कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रियांक खर्गे यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.
काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान केला जात आहे. भाजपा व महाराष्ट्रातील जनता सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही. प्रियांक खर्गे यांनी त्वरित आपले विधान मागे घ्यावे व जाहीर माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्यावरच होता. उद्धव ठाकरे हे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात. मात्र हिंदुत्वाचा हा अपमान होत असताना त्यांनी आपली भूमिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावी. अशावेळी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होत आहे असे ते म्हणाले.