२८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत का, हे चाचपणीनंतर उद्धव ठाकरेंना कळेल
By कमलेश वानखेडे | Published: July 17, 2024 07:15 PM2024-07-17T19:15:53+5:302024-07-17T19:16:44+5:30
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला : राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार
कमलेश वानखेडे
नागपूर : उबाठा हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी युती करावी, त्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे. स्वबळावर लढण्याचा विचार उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये असू शकतो. त्यामुळे कदाचित ते राज्यभर चाचपणी करत असतील. २८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत की नाही हे त्यांना चाचपमणी केल्यावर कळेल, असा टोला उद्योगमंत्री उदय सामांत यांनी लगावला.
नागपुरात बुधवारी पत्रकारांशी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, आदित्य ठाकरे हे अडीच वर्षापासून महाराष्ट्र सत्ता परिवर्तन होईल असे म्हणत होते. पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल. शेकापचे जयंत पाटल यांनी जो आरोप केलेला आहे. त्या अनुषंगाने विधानसभेला दोन तीन महिने बाकी आहे. कुणी कुणी महायुतीला मतदान केले याचे पडसाद विधानसभेत दिसतील. जयंत पाटील याांची मतं फुटणार हे डोळ्यासमोर दिसत होते. एका चांगल्या राजकीय पक्षातील नेत्याला संपवण्याचे काम महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या केले, असा आरोप त्यांनी केला. अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री आहेत. त्यांना कुठल्या सूत्रांनी सांगितले मला माहित नाही. विधान परिषदेमध्ये त्यांनी ट्रेलर बघितलेला आहे. विधानसभेत काय होणार हे त्यांनाही माहित आहे. सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्याचे काम ते करत आहे, असा चिमटाही सामंत यांनी घेतला.
चारुलता टोकस यांचे महायुतीत स्वागत करू
काँग्रेस नेत्या चारुलता टोकस यांना ऑफर दिली की नाही, हे मला माहिती नाही. पण टोकस यांचं महायुतीमध्ये स्वागत आहे, असे सांगत टोकस यांच्या प्रवेशाचे संकेत दिले. विदर्भात किती जागा लढायच्या या संदर्भात आम्ही यादी तयार केलेली आहे. हा सगळा अधिकार मुख्यमंत्री शिंदे यांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशाल गडाच्या बाबतीत जातीपातीचे राजकारण करण्यात अर्थ नाही. अनधिकृत बांधकामामुळे झालेला तो उद्रेक होता. निवडणूक आल्या म्हणून जातीपातीचे धर्माचा राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचे काम कोणी करू नये, असे सांगत त्यांनी खा. ओवेसी यांना सुनावले.