"राजकीय जनाधार संपल्याचे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल"
By कमलेश वानखेडे | Published: April 13, 2024 05:08 PM2024-04-13T17:08:23+5:302024-04-13T17:08:40+5:30
नीलम गोऱ्हे यांची टीका : रामटेक मतदारसंघात प्रचार दौऱ्यात सहभागी.
नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या मनात प्रचंड मोठा द्वेष आहे. त्या संतापाच्या भरात ते बोलत असतात. ते त्यांच्या मनातील बोलत आहेत. जामिनीवरील लोकांचे काय मत आहे, हे ४ जूनला सिद्ध होईल. कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत, राजकीय दृष्ट्या जनाधार संपला एवढे मात्र उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल, अशी टीका विधान परिदेच्या उपसभापती व शिंदेसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली.
रामटेक लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी शनिवारी सकाळी त्या नागपुरात दाखल झाल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, गजानन कीर्तिकर यांनी ईडी, सीबीआय संदर्भात व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत असावे, त्यांच्या वैयक्तिक मतासंदर्भात पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेईल. संजय राऊत यांचा प्रचंड ज्ञानी आहे, मी त्यापुढे सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुठलं उत्तर न देणे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच आहे.
राहुल गांधी यांनी स्वत:च केलेले जाहीरनामे आणि मनमोहन सिंग यांच्या काळातील निर्णयाचे कागद फाडून टाकले होते. तसे स्वतःच्या खासदारांचे निर्णय ते फाडून तर टाकणार नाही ना, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही त्या म्हणाल्या.
भावना गवळी यांना सामावून घेऊ
- खा. भावना गवळी यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. त्यांचे कार्य दुर्लक्षित राहणार नाही. त्यांना सामावून घेऊ असे मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे. मुख्यमंत्री स्वतःचा शब्द लगेचच पाळतात. यावर लवकरच चांगल्या प्रकारे मार्ग निघू शकेल. भावना गवळी यांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
अवकाळी नुकसानीच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- विदर्भात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाल आहे. प्रचार सुरू होण्याअगोदर त्यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मदतीचे निर्देश दिलेले आहे. पंचनामे करण्यासाठी पाऊस थांबणे गरजेचे आहे. पाऊस थांबल्याशिवाय पंचनामे करणार कसे, किती नुकसान झाले. याचा अंदाज घेण्यासाठी पाऊस थांबणे गरजेचे असते, असेही गोऱ्हे यांनी सांगितले.