हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात 

By कमलेश वानखेडे | Published: April 17, 2023 10:33 AM2023-04-17T10:33:49+5:302023-04-17T10:38:00+5:30

महाविकास आघाडीची दुसरी ‘वज्रमूठ’ सभा रविवारी पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर पार पडली

Uddhav Thackeray's attack on bjp and shinde-fadnavis govt in Vajramuth Sabha in Nagpur | हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात 

हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात 

googlenewsNext

कमलेश वानखेडे

नागपूर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सतत संकट येत आहे. अवकाळी पावसाने पिकं उद्ध्वस्त होत आहेत. हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार सत्तेवर आले आहे, असा घणाघात करीत यांना सत्तेपासून खाली खेचण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही, असा निर्धार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वज्रमूठ’ आवळत व्यक्त केला.

महाविकास आघाडीची दुसरी ‘वज्रमूठ’ सभा रविवारी पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर पार पडली. सभेला जमलेली हजारोंची गर्दी पाहून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उत्साह वाढला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, माजी मंत्री आदित्य ठाकरे, अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, आमदार नितीन देशमुख, सभेचे संयोजक आमदार सुनील केदार आदी उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात अवकाळी पाऊस असताना मुख्यमंत्री शिंदे अयोध्येला गेले. मात्र, ते गेले म्हणून उपमुख्यमंत्रीही गेले. गाड्याबरोबर नाड्याची यात्रा झाली. मेरा शर्ट तेरे शर्ट से भगवा कैसे, हे दाखविण्याची चढाओढ लागली आहे. आम्ही पंतप्रधान मोदींना राममंदिरासाठी कायदा करा, असे म्हणत होतो. पण मोदी त्यावर बोलायला तयार नव्हते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर टीकोजी राव आता फणा काढून अयोध्येत जाऊन बसले, अशी टीका त्यांनी केली.

म्हणून मी 'फडतूस' शब्द वापरला

ठाण्यात एका महिलेवर तिच्या कार्यालयात जाऊन हल्ला करण्यात आला. तिने माफी मागितली तरी तिला मारहाण करण्यात आली. तिची तक्रारही दाखल करून न घेता उलट तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणून मी 'फडतूस'  म्हणजे बिनकामाचा हा शब्द वापरला, असे सांगत असे हिंदुत्व संघ, पंतप्रधान मोदी यांना मान्य आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

सच्च्या समाजसेवकासमोर तुम्हाला झुकावेच लागले

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सत्तेची मस्ती डोक्यात गेली असला तरी, सच्चा समाजसेवकासमोर झुकावेच लागते हे महाराष्ट्राने आज संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे, असा टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री शहा यांच्यावर नेम साधला. सत्तेची नशा पूर्ण देश उद्ध्वस्त करीत असल्याची टीका त्यांनी केली.

यांचे हिंदुत्व हे गोमुत्रधारी

  1. - मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले नाही. काँग्रेसमध्ये हिंदू नाहीत का? आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही. यांचे हिंदुत्व हे गोमुत्रधारी आहे. शिंपडता काय, प्राशन करा. थोडी अक्कल येईल, असे खडे बोल सुनावत आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Uddhav Thackeray's attack on bjp and shinde-fadnavis govt in Vajramuth Sabha in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.