'उद्धव ठाकरेंचं भाषण शिवाजी पार्कसारखं, शेतकऱ्यांचा नामोल्लेखही नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 01:17 PM2019-12-19T13:17:14+5:302019-12-19T14:01:31+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर देतील, शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा होती.
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर देतील, शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी फक्त शिवाजी पार्कवरचं भाषण केलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडलं नाही, असे सांगत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास सभात्याग केला.
राज्यपालांच्या अभिभाषणात देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असलेले सरकार तीन चाकी रिक्षासारखे असल्याचे सांगत महाविकास आघाडीला टोला लगावला होता. तसेच प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. 'स्थगिती सरकार' अशी प्रतिमा होणं धोकादायक असल्याचे सांगत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाला प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देऊ असं घोषित केलं होतं मात्र, त्यांच्या पदरी काहीही पडलं नाही. त्यांच्या भाषणात शेतकरी हा विषयदेखील आला नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, स्वा. सावरकरांच्या संदर्भातले मुद्दे असतील याला बगल दिली. आमची एकच अपेक्षा होती, त्यांनी स्वत: वचन दिलं होतं की, अवकाळी पावसाळाग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत करू. मात्र, एक रुपयाचीही मदत केली नाही. हे विश्वासघातकी सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं राज्यपालांच्या अभिभाषणाला दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं नावही घेतलं नाही, अशा सरकारचा आम्ही निषेध करतो असेही फडणवीस यांनी म्हटलंय. त्यानंतर, भाजपा आमदारांसह फडणवीस यांनी सभात्याग केला. फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.