मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उमा भारतीही संघ दरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:13 AM2018-12-29T01:13:54+5:302018-12-29T01:15:48+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ दरबारी हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यासोबत झालेल्या या गुप्त बैठकीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, संघाने यावर काय भूमिका घेतली यावर पदाधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ दरबारी हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यासोबत झालेल्या या गुप्त बैठकीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, संघाने यावर काय भूमिका घेतली यावर पदाधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रेशीमबाग स्मृतीभवन येथे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. या बैठकीत नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भातील संघ परिवारातील संघटनांच्या महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. येत्या चार ते पाच महिन्यांवर लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर लगेचच राज्याच्या विधानसभा निवडणुका असतील. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघामधील महत्त्वाच्या नेत्यांच्या या बैठकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु झाली आहे.
भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांशी समन्वय राहावा किंवा असा समन्वय साधला जावा, असे प्रयत्न करण्यासाठी ही बैठक होती, असेही म्हटले जात आहे. मात्र, बैठकीचे नेमके कारण काय, बैठकीत आणखी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली, हे अजून समोर आले नाही.
मुख्यमंत्र्यांपाठोपाठ केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही शुक्रवारी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. उमा भारती या नागपुरात मा.गो. वैद्य यांना भेटण्यासाठी येत-जात असतात. परंतु शुक्रवारी सकाळी १० वाजता त्या नागपुरात पोहोचताच थेट संघ मुख्यालयात गेल्या. यानंतर त्यांनी मा.गो. वैद्य यांचीही भेट घेतली. उमा भारती या नागपूरला आल्या की, पत्रकारांशी थेट खुली चर्चा करतात. परंतु आजची बैठक मात्र त्यांनी अतिशय गोपनीय ठेवली होती. तसेच संघ मुख्यालयाबाहेर असलेल्या पत्रकारांशी कुठलीही चर्चा न करताच त्या निघून गेल्या. विशेष म्हणजे संघांच्या अनेक पदाधिकाºयांनाही त्यांच्या भेटीची माहिती नव्हती.