नागपुरात उमरेडच्या तरुणाची निर्घृण हत्या : उधारीच्या पैशाचा वाद भोवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 09:32 PM2019-07-30T21:32:19+5:302019-07-30T23:40:00+5:30
उधारीच्या पैशाच्या वादातून पाच आरोपींनी जोगीठाणा पेठ (उमरेड) येथील एका तरुणाची निर्घृण हत्या केली. आनंद प्रभाकर शिरपूरकर (२४) असे मृताचे नाव आहे तर, प्रवीण चंद्रदर्शन रंगारी (२५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तो मृत आनंदचा मित्र असून, घटनेच्या वेळी आनंदच्या मदतीला धावला म्हणून आरोपींनी त्यालाही गंभीर जखमी केले. गंगाबाई घाट चौकाजवळच्या गुजरनगर झोपडपट्टी परिसरात सोमवारी रात्री १० च्या सुमारास हा थरार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/ उमरेड : उधारीच्या पैशाच्या वादातून पाच आरोपींनी जोगीठाणा पेठ (उमरेड) येथील एका तरुणाची निर्घृण हत्या केली. आनंद प्रभाकर शिरपूरकर (२४) असे मृताचे नाव आहे तर, प्रवीण चंद्रदर्शन रंगारी (२५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तो मृत आनंदचा मित्र असून, घटनेच्या वेळी आनंदच्या मदतीला धावला म्हणून आरोपींनी त्यालाही गंभीर जखमी केले. गंगाबाई घाट चौकाजवळच्या गुजरनगर झोपडपट्टी परिसरात सोमवारी रात्री १० च्या सुमारास हा थरार घडला.
रितेश शिवरेकर (वय २२), प्रफुल्ल शिवरेकर, समीर शेंडे आणि प्रदीप काळे (सर्व रा. गुजरनगर) तसेच यश गोस्वामी (रा. पारडी), अशी आरोपींची नावे आहेत.
मृत आनंद हा मागील सहा वर्षांपासून येथील गुजरनगरात भाड्याच्या खोलीत राहत होता. आनंदने आरोपी रितेश शिवरेकर (वय २२) याला काही दिवसांपूर्वी १५ हजार रुपये उधार दिले होते. आरोपी ही रक्कम परत देण्यास टाळाटाळ करीत असल्याने, आनंदचा आरोपीसोबत वाद सुरू होता. रितेशकडून रक्कम परत मिळावी म्हणून आनंदने त्याचा मित्र महेश मेहर याला रितेशला पैसे परत करण्यास सांगितले. महेशने सोमवारी रात्री रितेशला आनंदचे पैसे परत का करीत नाही म्हणून विचारणा केली. त्यावरून वादात भर पडली. दरम्यान, रात्री १० च्या सुमारास आनंद त्याच्या जुनी मंगळवारी येथे राहणाऱ्या बहिणीकडे जेवण करण्यासाठी जायला निघाला. त्याच्यासोबत प्रवीण रंगारी आणि महेश मेहर हे त्याचे मित्रही होते. त्यावेळी रितेश, प्रफुल्ल, समीर, प्रदीप आणि यश आरोपींच्या घरासमोर उभे होते. समोरासमोर झाल्यामुळे आरोपी आणि आनंदमध्ये पैशावरून बोलचाल झाली अन् पाहता पाहता वाद वाढला. आरोपींनी आनंदला मारहाण सुरू केली. त्यामुळे प्रवीण आनंदच्या मदतीला धावला. ते पाहून काही आरोपींनी त्याला पकडून ठेवले तर, रितेशने चाकू काढला. धोका लक्षात आल्याने आनंदने तेथून आपल्या घराकडे धाव घेतली. तो झोपडीत शिरताच आरोपी पाठलाग करीत त्याच्या मागे आले आणि त्यांनी रितेशच्या मानेवर, पोटावर, छातीवर चाकूचे सपासप घाव घातले तर, आनंदला वाचविण्यासाठी आरोपींसोबत दोन हात करणाऱ्या प्रवीणला गंभीर जखमी केले.
आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. शेजाऱ्यांनी आनंद आणि प्रवीणला परिसरातील एका खासगी इस्पितळात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी आनंदला मृत घोषित केले.
हत्याकांडाचा सूत्रधार फरार
डोळ्यादेखत आपल्या मित्राची हत्या झाल्यामुळे जखमी प्रवीणला जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यालाही आरोपींनी जबर दुखापत केली आहे. मात्र, या दुखापतीपेक्षा मानसिक धक्क्याने त्याची अवस्था जास्त वाईट केल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, कोतवालीचे ठाणेदार भोसले, पोलीस उपनिरीक्षक खरसान यांनी दिवसभर धावपळ करून आरोपी प्रफुल्ल, समीर, प्रदीप आणि यश या चौघांना अटक केली. मुख्य सूत्रधार आरोपी रितेश शिवरेकर फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दहशत निर्माण करण्यासाठी केली हत्या
मृत आनंदची हत्या आरोपी रितेश आणि त्याच्या साथीदारांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी केल्याची चर्चा आहे. आरोपी रितेश आणि त्याचे साथीदार गुजरवाडीत जुगार अड्डा भरवतात. तेथून रितेश नाल (कट्टा) काढायचा. जिंकलेल्याकडून रक्कम उकळायचा तर हरलेल्याला तसेच झोपडपट्टीतील गरजूंना दामदुप्पट दराच्या व्याजाने रक्कम द्यायचा. आनंद मात्र मनमिळावू होता. तो टाईल्सच्या दुकानात काम करायचा. त्याची आई आणि छोटी बहीण उमरेडमध्ये राहते. त्यांचा तो आधार होता. एवढेच नव्हे तर मित्रांना आणि वस्तीतील लोकांनाही आर्थिक मदत करायचा. त्यामुळे रितेशकडून व्याजाने रक्कम घेणारांची संख्या कमी झाली होती. या कारणामुळे रितेशला आनंद खटकत होता. त्याची हत्या केल्यास परिसरात आपली दहशत निर्माण होईल आणि कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर आपण भाई बनू, असे तो आपल्या साथीदारांना सांगत होता, अशी चर्चा आहे. दरम्यान, आनंदची हत्या झाल्याने त्याची वृद्ध आई आणि छोटी बहीण निराधार झाली आहे.