नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 09:55 PM2018-08-09T21:55:46+5:302018-08-09T21:56:23+5:30
ज्येष्ठ समाजसेवी व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गुरुवारी मोक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्येष्ठ समाजसेवी व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गुरुवारी मोक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरुवारी सकाळपासूनच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गुजरवाडी डालडा कंपनी चौक येथील निवासस्थानी चाहत्यांनी गर्दी केली होती. दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून उमेशबाबू यांचे एकूण कार्य पाहता व त्यांचे समाजासाठीचे योगदान बघता त्यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार व्हावे, अशी विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच ही विनंती मान्य करीत जिल्हा प्रशासनाला तसे आदेश दिले. यानंतर तातडीने प्रशासन कामाला लागले. दुपारी ४ वाजता तिरंग्यात लपेटलेले त्यांचे पार्थिव घेऊन अंत्ययात्रा निघाली. नया खूनचे कार्यालय, संत्रा मार्केट चौक, विजय टॉकीजमार्गे अंत्ययात्रा मोक्षधाम घाटावर पोहोचली. यावेळी उमेशबाबू अमर रहेच्या घोषणांनी आसमंत निनादला होता. येथे पोलिसांच्या जवानांनी बंदुकीच्या ११ फैरी झाडून उमेशबाबूंना सलामी दिली.
यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. यावेळी पालकमंत्री आणि गिरीश गांधी यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली. शोकसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख, रिपाइंचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार यादवराव देवगडे, माजी खासदार प्रकाश जाधव, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. आशिष देशमुख, आ. गिरीश व्यास, जिल्हाधिकरी अश्विन मुदगल, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, बाबुराव तिडके, माजी आमदार मोहन मते, एस.क्यू. जमा, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, हरिभाऊ नाईक, शब्बीर विद्रोही, डॉ. गोविंद वर्मा, उज्ज्वल ठेंगडी, राजाभाऊ टांकसाळे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, हरीश अड्याळकर, डॉ. हरीश धुरट, विलास गजघाटे, भीमराव फुसे, वंदना भगत, सुरेश घाटे, प्रदीप मैत्र, ब्रम्हाशंकर त्रिपाठी आदींसह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारितासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.