उमरेड-भिवापूर नाका वळणमार्ग धोक्याचा
By admin | Published: January 3, 2016 03:39 AM2016-01-03T03:39:58+5:302016-01-03T03:39:58+5:30
उमरेड-भिवापूर नाका येथील वळणमार्ग वाहनचालकांसाठी तसेच नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे.
अपघात वाढले : पथदिव्यांची नागरिकांची मागणी
उमरेड : उमरेड-भिवापूर नाका येथील वळणमार्ग वाहनचालकांसाठी तसेच नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे. या परिसरात पथदिव्यांची योग्य व्यवस्था नसल्याने नेहमीच अपघाताला सामोरे जावे लागते. शुक्रवारी (दि. १) रात्रीच्या सुमारास सदर वळणमार्गावर ट्रक आणि चारचाकी वाहनाचा अपघात घडला.
या ठिकाणी अपघात नेहमीचेच झाले असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. विशेषत: या परिसरात स्मशानभूमी आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी उशीर झालाच तर नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. चौक परिसरात सर्वत्र अंधार असून सातत्याने वाहनांची वर्दळ या महामार्गावर सुरूच असते. शिवाय निवासी नागरिकांची संख्याही या परिसरात वाढत आहे. अगदी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर नागरिक ‘मार्निंग वॉक’साठी याठिकाणी येतात. यामध्ये महिलांचीही संख्या बऱ्यापैकी असल्याने उमरेड पालिकेने याठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)